परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संतांची भेट घेतांना त्यांच्यातील कृष्णनीतीचे घडलेले दर्शन !
‘अनुमाने वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले नाशिक येथे आले असता त्यांनी एकाच दिवशी नाशिक येथील ३ संतांची भेट घेतली. त्या वेळी त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आणि कृष्णनीती यांचे आम्हाला दर्शन झाले.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका संतांना ज्या पद्धतीने सांगितले, ते ऐकतांना धन्य झाल्याचे वाटणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका संतांची भेट घेतली. त्यांची अनेक विषयांवर चर्चा झाली. नंतर परात्पर गुरु डॉक्टर त्या संतांना म्हणाले, ‘‘महाराज, आपण सर्व भक्तांची कुंडलिनी जागृत करता, तर मग विश्वाची कुंडली जागृत करा ना !’’ तेव्हा ते संत म्हणाले, ‘‘करतो प्रयत्न.’’ नंतर त्या संतांनी त्यांच्या भक्तांसाठी सकाळचा सामूहिक नामजप चालू केला. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या संतांना ज्या पद्धतीने सांगितले, ते प्रत्यक्ष ऐकतांना आम्ही धन्य धन्य झालो !
२. प.पू. बेजन देसाई यांच्या भेटीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील पराकोटीचा ‘शिष्यभाव’ अनुभवता येणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी प.पू. बेजन देसाई यांची भेट घेतली. प.पू. बेजन देसाई म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांसाठी ‘गुरु’रूपच होते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रत्येक हालचालीतून ‘शिष्यभाव’ कसा असावा ?’, याचे प्रात्यक्षिक आम्हाला पहायला मिळत होते आणि ते पाहून आमचे मन कृतार्थ होत होते. प.पू. देसाई परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाले, ‘‘इस बुरी शक्ती के पिछे क्यौ पडे हो ? सिर्फ उनको नमस्कार करो, बुरी शक्ती भाग जायेगी ।’’ तो संवाद चालू असतांना माझे लक्ष परात्पर गुरु डॉक्टरांच्या तोंडवळ्याकडे होते. त्यांचा तो ‘शिष्यभाव’ पाहून मी त्यांच्या चरणी विरघळून गेलो. परात्पर गुरु डॉक्टर प.पू. देसाईकाकांना ‘ठीक आहे, ठीक आहे’, असे उत्तर देत असतांना मी माझा राहिलोच नाही.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका संतांना केलेली विनंती त्यांना टाळता न येणे
नंतर एका संतांना भेटल्यावर वेगळेच अनुभवायला आले. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या संतांना साधकांच्या समवेत नामजप करण्याची विनंती केली. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना अशा पद्धतीने विनंती केली की, संतांना ते टाळता आले नाही आणि त्या संतांनी साधकांच्या समवेत नामजप केला.
४. जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटणे
आम्हाला तीनही प्रसंग अनुभवतांना कृष्णनीतीचे दर्शन होत होते. आजही त्या प्रसंगाची आठवण झाल्यास जसेच्या तसे प्रसंग डोळ्यांसमोर उभे रहातात आणि ‘जीवन कृतार्थ झाले आहे’, असे वाटते. हे अनुभव लिहीत असतांना ‘त्या प्रसंगांचे आपोआप जलद गतीने टंकलेखन होत आहे’, असे जाणवत होते.’
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (२३.३.२०१९)