गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी प्रामाणिकपणे कधी केला का ?

‘वर्ष १९८० पासून सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी स्वतःच्या हीन, स्वातंत्र्यमूल्यद्रोही कृत्यांनी गोव्याच्या सांस्कृतिक मूल्यांशी आणि देवभूमी असलेल्या या सोज्वळ, आध्यात्मिक प्रतिमेशी अन् पोर्तुगीजपूर्व काळापासून अबाधितपणे चालत आलेल्या भारतीय संस्कृतीशी अक्षम्य किळसवाणा द्रोह केलेला आहे ! ज्या असंख्य सर्वधर्मीय स्वातंत्र्यसैनिकांनी ऐन तारुण्य, संसारसुख, कुटुंब, स्वतःचे भवितव्य आदी सगळेच पणाला लावून, शत्रू पोर्तुगिजांच्या गुलामीतून गोवा मुक्त करण्यासाठी प्रसंगी प्राणांचे बलीदान दिले, त्या सर्वांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्यमूल्य आकांक्षांचा पार चुराडा अन् घोर अपमान आतापर्यंतच्या सत्तांनी केलेला आहे ! हे परमेश्वरा, हे भारतमाते, हे क्रांतीदेवते, यांना कदापि क्षमा नको ! ते क्षमेस पात्र नाहीत. १९ डिसेंबर १९६१ या दिवशी भारतीय सेनेने गोवा मुक्त केला. आपण सर्व स्वतःलाच आधी एक प्रश्न विचारू आणि त्याचे प्रामाणिक उत्तर शोधू.

पोर्तुगीज काळात गोमंतकियांचा झालेला छळ

वर्ष १९८० पासून आतापर्यंत सत्तेत आलेल्या सरकारांनी खरेच गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले का ? कि गोवा मुक्तीमागच्या स्वातंत्र्यमूल्यांचा सत्तेच्या लालसेपायी पार चुराडा करून टाकला ? गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ? या संदर्भातील १ ते १२ पर्यंतची सूत्रे आपण ८ ते १० जुलै या दिवशी पाहिली. आज त्यापुढील अंतिम सूत्रे पाहूया.

१३. ‘गोवा, दमण, दीव स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास’ या मनोहर हिरबा सरदेसाई लिखित पुस्तकाचे २ खंड, स्वातंत्र्यसेनानी टी.बी. कुन्हा यांचे ‘डिनॅशनलायजेशन ऑफ गोवन्स’, अ.का. प्रियोळकर यांचे ‘इन्क्विझिशन ऑफ गोवा’ या महत्त्वाच्या पुस्तकांचे पुनर्मुद्रण आणि ही पुस्तके सर्व शाळांना पाठवण्याचे सरकार मनावर घेत नाही.

१४. गोव्यातील ५१ किल्ल्यांची डागडुजी आणि जतन, त्यांचा संबंध पर्यटनाशी जोडणे, हॉटेल चालवायला विकलेले किल्ले परत घेऊन त्यांचा सन्मान राखणे एवढ्या वर्षांत जमू नये ? खासगी मालकांना विकलेल्या भूमीत अंतर्भूत असलेले महत्त्वाचे ऐतिहासिक अवशेष नोंद न घेता नामशेष होऊ दिले जात आहेत. किती गोष्टी सांगायच्या ? स्वतः सरकारेच मानसिक गुलामगिरीत आहेत. क्रांतीदिन, मुक्तीदिन फक्त मिरवण्यापुरते आणि नेत्यांनी सलामी घेण्यापुरतेच मर्यादित राहिले ! सार्थ क्रांतीदिन, सार्थ मुक्तीदिन पुढच्या पिढ्यांना तरी पहाता येईल का ? सत्ता आणि लांगूलचालन यांच्या पलीकडे जाऊन, राष्ट्रीयतेची जाणीव असली तरच तरणोपाय ! स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग सत्ताधार्‍यांनी निष्फळ ठरवलेला आहे ! दैवदुर्विलास ! दुसरे काय ?

(समाप्त)

– प्रा. सुभाष वेलिंगकर, भारतमाता की जय संघटना, गोवा.