सनातनच्या रामनाथी आश्रमातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. मनोज कुवेलकर यांना आलेल्या अनुभूती

‘५.७.२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा होती. या दिवशी बराच वेळ परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण झाल्याने मी पूर्ण दिवस आनंदात होतो. ६.७.२०२० या दिवशी गुरुदेवांनी मला पूर्ण दिवसभर दिलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. मनोज कुवेलकर

१. श्रीविष्णूच्या व्यापक रूपातील आशीर्वादरूपी हातातून पांढरा प्रकाश दिसणे आणि भावजागृती होणे

६.७.२०२० या दिवशी सकाळी ९.३० वाजता मी श्रीकृष्णाच्या चित्रासमोर ध्यानाला बसलो होतो. त्या वेळी श्रीविष्णु व्यापक रूपात दिसला. त्याचे चरण पृथ्वीवर होते आणि त्याचा मुकुट आकाशाला लागला होता. श्रीविष्णूच्या एका हातात सुदर्शनचक्र, एका हातात गदा, एका हातात कमळ आणि एक हात आशीर्वादरूपी होता. मी त्याच्या चरणांजवळ नामजप करत बसलो होतो. काही वेळाने ‘श्रीविष्णूच्या आशीर्वादरूपी हातातून पांढरा प्रकाश आला आणि तो माझ्या पूर्ण शरिरावर पडत आहे’, असे मला दिसले. त्यानंतर माझी भावजागृती झाली.

२. अंघोळीच्या वेळी गंगामाता आणि शिव यांचे दर्शन होणे अन् त्यांच्या आशीर्वादरूपी हातातून पांढरा प्रकाश बाहेर येऊन शरिरावर पडतांना दिसणे

६.७.२०२० या दिवशी अंघोळीच्या आधी जलदेवता, सप्तनदी आणि गंगामाता यांना नमस्कार करून प्रार्थना करत असतांना मला समोर काशीविश्वेश्वराचे मंदिर दिसले. त्याच्या बाजूला मला गंगानदी दिसत होती. मी गंगानदीमध्ये अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरून डुबकी मारली. पाण्यातून बाहेर येतांना माझ्या हातात शिवाची पिंडी आली. ती हातात घेऊन मी पाण्याच्या बाहेर आलो. त्या वेळी तिथे गंगामाता आणि शिव उभे असल्याचे मला दिसले. गंगामातेने पांढरी शुभ्र साडी परिधान केली होती आणि शिवाच्या एका हातात त्रिशूल अन् दुसर्‍या हातात डमरू होता. दोघांच्या आशीर्वादरूपी हातातून पांढरा प्रकाश बाहेर येत होता अन् तो माझ्या पूर्ण शरिरावर पडत होता.

३. श्रीविष्णूचे व्यापक रूपात दर्शन होत असतांना त्याच्या ठिकाणी एकदा श्रीविष्णु आणि एकदा परात्पर गुरु डॉक्टर दिसणे

६.७.२०२० या दिवशी आश्रमात भांडी आवरण्याची सेवा केल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता श्रीकृष्णाला कृतज्ञता व्यक्त करत असतांना मला श्रीविष्णु व्यापक रूपात दिसला. या वेळी श्रीविष्णूच्या ठिकाणी एकदा श्रीविष्णु आणि एकदा परात्पर गुरु डॉक्टर दिसत होते.

४. नामजपाला बसल्यावर पुष्कळ डोके दुखणे, त्या वेळी श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर श्रीविष्णूचे विराट रूप दिसणे आणि श्रीविष्णु अन् श्री भवानीदेवी यांनी सुदर्शनचक्र फिरवून डोकेदुखीचा त्रास दूर केल्याचे जाणवणे

६.७.२०२० या दिवशी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत मी पू. होनपकाका नामजप करत असतांना तिथे नामजपाला बसलो होतो. माझा आध्यात्मिक त्रास वाढल्याने मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ३ घंटे संत नामजप करत असतांना तिथे नामजपाला बसायला सांगितले आहे. नामजपाला बसल्यावर माझे डोके पुष्कळ दुखत होते आणि अस्वस्थताही जाणवत होती. त्या वेळी मी श्रीकृष्णाला त्रास दूर करण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा मला श्रीविष्णूचे विराट रूप दिसले. मी श्रीविष्णूला माझा त्रास दूर करण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा त्याने त्याच्या हातातील सुदर्शनचक्र माझ्या दिशेने सोडल्याचे जाणवले. श्रीविष्णूने सोडलेले सुदर्शनचक्र काही वेळ माझ्या शरिराभोवती फिरत राहिले. त्यानंतर मला वाघावर बसलेली श्री भवानीदेवी दिसली. श्री भवानीदेवीच्या एका हातात सुदर्शनचक्र, एका हातात गदा, एका हातात त्रिशूल आणि एक हात आशीर्वादरूपी होता. नंतर श्री भवानीदेवीला प्रार्थना केल्यावर श्री भवानीदेवीने तिच्या हातातील सुदर्शनचक्र माझ्या दिशेने सोडले. ते सुदर्शनचक्र काही वेळ माझ्या भोवती फिरत राहिले. काही वेळाने ध्यानातून बाहेर आल्यानंतर माझे डोके दुखायचे थांबून शरीर पूर्ण हलके झाले होते. त्या वेळी माझा ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप चालू झाला.

परात्पर गुरु डॉक्टरांनी गुरुपौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी या सर्व अनुभूती दिल्या. यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. मनोज नारायण कुवेलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.७.२०२०)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक