देवद आश्रमातील सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकरकाका यांच्याकडून साधिका कु. स्वाती शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे
पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्या नावाचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उलगडलेला सुंदर अर्थ !‘आपला मुलगा पुढे ‘गुरुनाथ’ (म्हणजे ‘गुरु ज्याचे नाथ आहेत’, असा) होणार असल्याने पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्या आई-वडिलांनी त्यांचे आधीच योग्य नाव ठेवले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
आज आपण देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्याकडून साधिका कु. स्वाती शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि पू. दाभोलकरकाका यांना आलेली अनुभूती येथे पाहूया.
१. पू. दाभोलकरकाका यांच्यातील नम्रता आणि प्रेमभाव पाहून साधनेचे प्रयत्न करण्यास अन् स्वभावदोष आणि अहं यांच्याशी लढण्यास प्रेरणा मिळणे
‘पू. दाभोलकरकाका मला प्रतिदिन महाप्रसादाच्या वेळी भेटतात आणि नम्रपणे ‘नमस्कार’, असे म्हणतात. ते भेटल्यावर मला पुष्कळ प्रेमाने विचारतात, ‘‘त्रास न्यून झाला का ? नामजपादी उपाय चालू आहेत ना ?’’ त्यांच्यातील नम्रता आणि प्रेमभाव पाहिल्यावर ‘आपण साधनेचे प्रयत्न करायला पुष्कळ अल्प पडतो. मला नम्रता वाढवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करायला पाहिजेत’, याची जाणीव होते. तसेच मला स्वभावदोष आणि अहं यांच्याशी लढण्याची प्रेरणा मिळते.
२. पू. दाभोलकरकाकांनी घरी जाण्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्यावर ‘भगवंतच घरी जाण्यातील अडथळे दूर करत आहे’, असे वाटून हलके वाटणे
वर्ष २०२० च्या दिवाळीला मी घरी जाणार होते. तेव्हा आध्यात्मिक त्रासामुळे माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते आणि घरी जाण्यात अडथळेही येत होते. मी पू. काकांना सांगितले, ‘‘मला घरी जायचे आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘जाऊन या ! तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद !’’ तेव्हा मला पुष्कळ चांगले वाटले. ‘आता भगवंतच अडथळे दूर करून मला घरी घेऊन जाईल आणि परत घेऊनही येईल’, अशी माझी श्रद्धा वाढली आणि मला हलके वाटू लागले. त्या वेळी मला घरी जाण्याचा आनंद घेता आला.’
– कु. स्वाती शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.१२.२०२०)
पाऊलवाटेच्या मार्गाचे रूंदीकरण करतांना कामगारांनी मार्गातील वारुळावर कुदळ आणि फावडी मारताच आतून एक सुवर्णमयी, तुकतुकीत कांतीचा आणि तेजस्वी असा मोठा नाग बाहेर येणे अन् त्याने भूमीवर फणा आपटून क्षणार्धात प्राण सोडणे !
‘२५.७.२०२० च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘मनोरंजनासाठी नागांचा उपयोग करण्यापेक्षा श्रद्धेने नागांचे पूजन करून नागदेवतेची खरी कृपा संपादन करा !’ या मथळ्याखाली ‘नागांच्या रूपात अनेक दिव्य जीव साधना करत असल्याने त्यांना त्रास देण्याने मनुष्याचे पाप वाढते’, असे लिहिले होते. हे वाचल्यानंतर ७० वर्षांपूर्वी ऐकलेली एक सत्यकथा मला आठवली.
आमच्या गावातील एक वृद्ध गृहस्थ प्रतिदिन प्रातःकाळी गावाबाहेरील एका देवीच्या मंदिरात नित्यनेमाने पूजेसाठी जात असत. त्यांचा जाण्याचा मार्ग थोडा आड रानातून होता. तशी ती पायवाटच होती. त्या वाटेच्या कडेला एक मोठे वारुळ होते. ते गृहस्थ मंदिरात जातांना वाटीभर दूध घेऊन जात असत आणि वारुळासमोर ती वाटी ठेवून पुढे मार्गस्थ होत असत. ते परत येतांना ती वाटी घ्यायचे. तेव्हा त्या वाटीत एक पावली (चार आणे) मिळायचे. कालांतराने पुढच्या गावात जाण्यासाठी त्या पायवाटेचा बैलगाडीने जाण्या-येण्यासाठी मार्ग करायचे ठरले.
मार्गाचे काम चालू झाले. मार्गामध्ये ते वारुळ येत होते. ते तोडण्यासाठी कामगारांनी त्याच्यावर कुदळ आणि फावडी मारताच क्षणात आतून ‘फूऽस फूऽस (फॉॅऽऽऽस,फॉऽऽऽस)’ असा मोठा आवाज ऐकू आला. तेव्हा कामगार हत्यारे टाकून पळाले. ते दूर उभे राहून पाहू लागले. त्यांच्यासमोर अंगाचा थरकाप उडवणारी आणि रक्त गोठवणारी घटना घडत होती. एक सुवर्णमयी, तुकतुकीत कांतीचा आणि तेजस्वी असा भला मोठा नाग फणा काढून ताठ उभा राहिला. तो इतका ताठ झाला की, त्याची उंची ५ फुटांपेक्षा अधिक असावी. क्षणार्धात त्या नागाने भूमीवर फणा आपटून प्राण सोडला. ‘त्याच्या डोळ्यांवरील केस ९ इंच लांब होता’, असे ऐकले होते.’
– (पू.) गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.७.२०२०)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |