बारामतीतील तरुणाने ‘रॉ’ची भीती दाखवत पुणे येथील तरुणीकडून उकळले १० लाख रुपये !
‘ऑनलाईन’ मैत्री करून विश्वास टाकल्याचे उदाहरण ! तरुणी यातून बोध घेतील ही अपेक्षा !
पुणे, ११ जुलै – अमेरीकन तपास संस्थेचा अधिकारी असून आम्ही भारतामध्ये तपास करण्यासाठी आलो आहोत, तुझ्यावर भारतातील ‘रिसर्च अँड ऍनालिसीस विंग’(रॉ)’ या तपास संस्थेचे लक्ष आहे, अशी भीती दाखवत अमित चव्हाण या आरोपीने धनश्री हासे या तरुणीला फसवले. तरुणीकडून भ्रमणसंगणकासह १० लाख रुपयांची रक्कम घेतली आहे. या प्रकरणी धनश्री हासे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानुसार चतुःशृंगी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. एप्रिल ते ७ जुलै या कालावधीत ही घटना घडली. आरोपी अमित चव्हाण हा बारामती येथे वॉटर फिल्टर टेक्निशीअन आहे. त्याने याच पद्धतीचे ३ ते ४ गुन्हे केले आहेत.
हासे या ‘फॅशन डिझायनर’ आहेत. त्यांची काही दिवसांपूर्वी आरोपी अमित समवेत ‘बेटर हाफ’ ‘सोशल मीडिया’द्वारे ओळख झाली होती. त्या वेळी आरोपीने त्याचे नाव राहुल पाटील असे सांगून तो अमेरिकेत ‘इंटेलिजन्स’ अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीशी मैत्री करून लग्नाचे आमीष दाखवत अमितने तिच्याकडील भ्रमणभाष आणि लॅपटॉपमधील माहिती नष्ट करण्यास सांगून तिच्याकडून वेळोवेळी ‘ऑनलाईन’ रक्कम घेतली.