सर्वांगांनी उत्तम वैद्य आणि साधकांप्रतीच्या निरपेक्ष प्रेमामुळे साधकांना आधार देणारे बहुगुणी पू. विनय नीळकंठ भावे !
२५.६.२०२१ या दिवशी सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावेकाका (वय ६९ वर्षे) यांनी मोर्डे, जिल्हा रत्नागिरी येथे देहत्याग केला. साधकांना पू. विनय भावेकाका म्हणजे ‘एक पितृतुल्य संत आहेत’, असे वाटत असे. साधकांनी त्यांच्या सहवासात अनुभवलेले भावक्षण येथे दिले आहेत.
श्री. शिरीष देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. पू. वैद्य विनय भावेकाका यांच्या देहत्यागाची वार्ता अकस्मात् समजल्यावर मन सुन्न होणे : ‘पू. वैद्य भावेकाका यांच्या देहत्यागाची वार्ता मला अकस्मात् समजली आणि मन सुन्न झाले. काही मास आधीच त्यांच्या हृदयावर उपचार झाले होते. ‘त्यानंतर एवढ्या लवकर त्यांच्या प्रकृतीत प्रतिकूल फरक पडेल’, असे वाटले नव्हते. शेवटी ईश्वरेच्छा !
२. पू. वैद्य भावेकाका यांच्या मनमोकळ्या स्वभावाने सर्वच त्यांच्याकडे आकर्षित होणे : २३ – २४ वर्षांपूर्वी मी साधनेला प्रारंभ केला. तेव्हा देवद आश्रमात माझा पू. भावेकाकांशी परिचय झाला. पू. वैद्य भावेकाका यांच्या मनमोकळ्या स्वभावाने सर्वच साधक त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. त्यांना प्रत्येक साधकाला साहाय्य करण्याची ओढ होती. मी साधनेत नवीन असतांनाही त्यांनी मला पुष्कळ सांभाळून घेतले. त्यानंतर पू. भावेकाका यांच्याशी माझी जवळीक निर्माण झाली.
३. केवळ साधकांशीच नाही, तर त्यांच्या कुटुंबियांशीही जवळीक साधणे : पू. वैद्य भावेकाका केवळ साधकांशीच नाही, तर त्यांच्या कुटुंबियांशीही जवळीक साधत. मी २ वर्षे पत्नी कै. (सौ.) अरुणा आणि मुलगा, सून, नात-नातू यांच्या समवेत देवद आश्रमात रहात होतो. त्या काळात माझ्या पत्नीला (कै. (सौ.) अरुणाला) पू. वैद्य भावेकाका यांच्या सत्संगाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ झाला. त्या वेळी तिने प्रथमच ॲलोपॅथी औषधांचे सेवन सोडून पू. वैद्य भावेकाका देत तीच आयुर्वेदाची औषधे घेण्यास प्रारंभ केला होता.
४. परात्पर गुरुदेवांवर संपूर्ण श्रद्धा अन् भाव असल्याने त्यांची प्रत्येक आज्ञा शिरसावंद्य मानणे : पू. वैद्य भावेकाका परात्पर गुरुदेवांची प्रत्येक आज्ञा शिरसावंद्य मानायचे. वर्ष २०१३ मध्ये मी गोव्याला पूर्णवेळ साधनेसाठी आलो. काही दिवसांनंतर पू. भावेकाका यांचे संतपद घोषित झाले. त्या वेळी गुरुदेवांनी त्यांना रामनाथी आश्रमात रहायला सांगितले. त्यांचे वरसई येथील घर आणि भूमी धरणाच्या पाण्याखाली गेल्याने त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात शेतभूमी खरेदी करून तेथे घर बांधण्याची प्रक्रिया चालू केली होती, तरीही त्यांनी आश्रमाजवळ घर विकत घेऊन आपला मुक्काम हालवला. उर्वरित सर्व उत्तरदायित्व सौ. भावेवाहिनी बघत होत्या. तेव्हापासून मधल्या काळात लांब गेलेले पू. वैद्य भावेकाका परत निकट आले. त्या वेळी त्यांनी मला गुरुदेवांच्या समवेत घडलेले २ प्रसंग सांगितले. ते त्यांच्याच शब्दांत येथे दिले आहेत.
४ अ. परात्पर गुरुदेवांनी संगणक शिकून घेण्यास सांगणे : संतपद घोषित झाल्यावर मी (पू. भावेकाका) परम पूज्यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी मला रामनाथीलाच रहायला येण्यास सांगितले. मी त्यांना म्हणालो, ‘‘येथे सर्व सेवा संगणकावर चालते आणि मला संगणक वापरता येत नाही.’’ परम पूज्य म्हणाले, ‘‘मला तरी कुठे येत होता; मात्र मी शिकून घेतला. तुम्हीही शिकून घ्या.’’ नंतर माझा संगणकाचे धडे गिरवण्यास प्रारंभ झाला.
४ आ. परात्पर गुरुदेवांनी एका अपघातातून वाचवणे आणि त्यांनी त्याचे श्रेय ईश्वराला देणे : एकदा मडगाव येथे मार्गावरून (रस्त्यावरून) चाललो असतांना वरच्या मजल्यावरून एक मोठी लोखंडी सळी अंगावर आली. डोक्यावर पडली असती, तर कपाळमोक्षच झाला असता; मात्र ती सळी अंगाला थोडी घासून लांब पडली. हा प्रसंग मी गुरुदेवांना सांगितला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘बघा, तुम्हाला देवाने वाचवले.’’ म्हणजे वाचवले गुरुदेवांनीच आणि श्रेय दिले ईश्वराला ! अर्थात् माझ्यासाठी (पू. भावेकाकांसाठी) ते दोघेही एकच आहेत.’ (२६.६.२०२१)
अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. साधकांप्रतीच्या निरपेक्ष प्रेमामुळे साधकांना पू. भावेकाकांचा आधार वाटणे : ‘पू. भावेकाका यांच्याशी माझा प्रत्यक्ष संपर्क ते रामनाथी आश्रमात रहायला आल्यावर आला; परंतु त्यापूर्वीच मला त्यांचे नाव ऐकूनच त्यांच्याविषयी पुष्कळ आत्मीयता वाटायची. माझा त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क नसतांनाही मला त्यांचा आधार वाटायचा. यावरून ‘त्यांच्यात साधकांप्रती किती निरपेक्ष प्रेम होते ?’, याची प्रचीती येते. आमची प्रत्यक्ष भेट झाल्यावर ते नेहमी माझी आणि कुटुंबियांची प्रेमपूर्वक विचारपूस करायचे. मी त्यांच्या खोलीत गेल्यावर ते मला आवर्जून खाऊ द्यायचे. मी त्यांना एखाद वेळी ‘पाय चेपून देऊ का ?’, असे विचारल्यास ते ‘केवळ मला आनंद मिळावा’, म्हणून ‘हो’ म्हणायचे आणि सेवा करू द्यायचे. एरव्ही त्यांना ‘त्यांची सेवा कुणीतरी करावी’, अशी अपेक्षा नसायची.
२. पू. भावेकाकांवर अन्नपूर्णादेवी प्रसन्न असणे : भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, लोणचे इत्यादी पदार्थ करून साधकांना खाऊ घालणे, हा पू. काकांचा स्थायीभाव होता. पू. काकांनी बनवलेल्या पदार्थांना एक वेगळीच चव असायची. ‘आजच्या भोजनात पू. काकांनी एखादा पदार्थ केला आहे’, असे समजल्यावर साधक सेवा सोडून महाप्रसाद ग्रहण करायला जायचे. काही वेळा पू. काकांची केवळ दृष्टी पदार्थावर पडली, तरी पदार्थ उत्तम व्हायचा. अनेक साधकांनी अशी अनुभूती वेळोवेळी घेतली आहे. पू. काका पदार्थांत विशिष्ट मसाले घालत नव्हते, तर त्यांचे साधकांवर प्रेमच इतके होते की, ते पदार्थाच्या चवीच्या रूपाने प्रगट व्हायचे.
३. सर्वांगांनी उत्तम वैद्य ! : परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेल्या एका लेखात मी प.पू. अण्णा करंदीकर यांच्याविषयी वाचले होते. एखादा रुग्ण घरून निघाल्यावरच प.पू. अण्णा त्यांच्या पत्नीला सांगायचे, ‘‘अमूक एक रुग्ण येणार आहे. त्याला अमुक आजार आहे आणि त्याच्यासाठी ही औषधे लिहून ठेव.’’ त्यांना रुग्णाविषयी एवढे सूक्ष्मातील कळायचे. हा अनुभव मी पू. भावेकाकांच्या संदर्भातही घेतला. पू. काका रुग्ण तपासणीच्या वेळी त्यांची जपमाळ घेऊन नामजप करत असायचे. ते डोळे बंद करूनच रुग्णाचे सर्व ऐकायचे. जणूकाही ते सूक्ष्मातून रुग्णाचे निदान करत आहेत. पू. काकांचे निदान अचूक असायचे. त्यांनी दिलेल्या औषधांची मात्रा रुग्णांना तंतोतंत लागू पडायची. ते प्रसंगी साधकांना त्यांच्या आजारासाठी नामजपही सांगत. पू. काका साधकांना केवळ औषधे देऊन थांबत नसत, तर संबंधित साधक भेटल्यावर त्याची आस्थेने विचारपूसही करत. साधक त्यांना कधीही आरोग्याविषयी तक्रारी सांगायचे आणि ते तितक्याच प्रेमाने साधकांना तपासायचे.
पू. काकांचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आयुर्वेदाचे प्रचंड ज्ञान होते; परंतु त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ते कधीही कुणाला तसे जाणवू देत नव्हते. ते आमच्या बालबुद्धीला समजेल, अशा भाषेत तितक्याच विनम्रतेने आयुर्वेदाविषयी सांगायचे.
४. प.पू. भक्तराज महाराज यांच्या साजरा झालेल्या अमृत महोत्सवाप्रमाणे भव्य-दिव्य असा परात्पर गुरु डॉक्टरांचाही अमृत महोत्सव साजरा करण्याचे पू. भावेकाकांचे स्वप्न ! : ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाप्रमाणेच परात्पर गुरु डॉक्टरांचा अमृत महोत्सव भव्य-दिव्य प्रमाणात व्हावा’, असे पू. काकांना नेहमी वाटायचे. ते मला म्हणायचे, ‘‘योगेश, असा अमृत महोत्सव आयोजित झाल्यास मी तेथील अन्नपूर्णा कक्षाचे (म्हणजे स्वयंपाकघराचे) दायित्व घ्यायला सिद्ध आहे.’’ पू. काकांची ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढावा’, अशीही इच्छा होती. त्यांच्या त्या भावामुळेच कदाचित् महर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांचा अमृत महोत्सव साजरा करायला सांगितले आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनावर आधारित एक लघुपट सिद्ध झाला.
५. अन्यायाविषयी प्रचंड चीड : पू. भावेकाका स्थिर आणि शांत असायचे. त्यांनी आयुष्यात कधी डास किंवा मुंगी यांनाही मारले नसेल, इतके ते सात्त्विक होते; मात्र हिंदूंवर निरंतर होणारे आघात, समाजातील भ्रष्टाचार, स्त्रियांवर होणारे अत्याचार, संत-सज्जनांची होणारी मुस्कटदाबी, परकीय आक्रमणे, यांविषयी बोलतांना पू. काकांमधील क्षात्रभाव प्रकट व्हायचा. त्यांना अन्यायाची प्रचंड चीड होती. ते संबंधितांवरील अन्याय दूर होण्यासाठी सातत्याने प्रार्थना करायचे. ‘दुष्प्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी देवाने लवकरात लवकर अवतार घ्यावा’, असे ते सहज बोलून जात.
६. जीवनातील कठीण प्रसंगांना ईश्वराप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर धिराने सामोरे जाणे : पू. काकांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले. ते त्या प्रसंगांना धिरोदात्तपणे सामोरे गेले. त्यांनी त्यांचे दुःख कधीही कुणासमोर व्यक्त केले नाही. कठीण प्रसंगांतही त्यांची ईश्वरावरील श्रद्धा तसूभरही ढळली नाही किंवा त्यांच्या मनात विकल्पही निर्माण झाले नाहीत. पू. काकांचा हिंदु राष्ट्रासाठी त्याग अविस्मरणीय असाच आहे.
आम्हाला अशा बहुगुणी पू. भावेकाकांचे सान्निध्य काही काळ लाभले. त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. भावेकाका यांच्या चरणी कृतज्ञता !’ (२६.६.२०२१)