मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील पीडित अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत !
आरोपींना जलद शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !
मुंबई – मुंबई लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटाला ११ जुलै या दिवशी १५ वर्षे झाली, तरी आरोपींना अद्याप शिक्षा झाली नाही. त्यामुळे दुर्घटनेतील पीडित अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. या बॉम्बस्फोटासाठी ‘सिमी’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ या अतिरेकी संघटनांनी योजनाबद्धरीत्या सिद्धता करून हे स्फोट घडवून आणले होते.
या घटनेत आतंकवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या १३ आणि फरार १५ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोपपत्र प्रविष्ट केले. ११ सप्टेंबर २०१५ या दिवशी न्यायालयाने या आरोपींना दोषी ठरवून कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दिकी, नावेद हुसेन खान, असिफ खान या ५ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख, सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख या ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे; मात्र जेव्हा आरोपींना प्रत्यक्ष शिक्षा होईल, त्याच वेळी आम्ही खरी श्रद्धांजली वाहू, अशी तीव्र प्रतिक्रिया साखळी बॉम्बस्फोटातील मृतांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. १५ वर्षे झाली तरी आरोपींना अद्याप शिक्षा झाली नसल्याचे दुःख पीडित व्यक्त करत आहेत.