राष्ट्रगीतासाठी उभे न रहाणे, हा राष्ट्रगीताचा अवमान; मात्र गुन्हा नव्हे ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाची टिप्पणी
|
श्रीनगर – राष्ट्रगीतासाठी उभे न रहाणे, हा राष्ट्रगीताचा अवमान ठरू शकतो; मात्र तो राष्ट्रीय चिन्हांच्या अवमान रोखण्याच्या अधिनियमांच्या अंतर्गत गुन्हा होऊ शकत नाही, अशी टिप्पणी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने केली. या वेळी न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्या खंडपिठाने राष्ट्रगीताच्या अवमानाच्या प्रकरणी व्याख्याते डॉ. तौसिफ अहमद भट यांच्यावर नोंद करण्यात आलेला गुन्हा रहित केला.
“राष्ट्रगान के लिए खड़े नहीं होना या चुप रहना मौलिक कर्तव्यों का पालन करने में अनादर और विफलता के बराबर हो सकता है; लेकिन यह अपराध नहीं”: जम्मू-कश्मीर हाईकोर्ट #NationalAnthem #FundamentalDuties #J&KHC https://t.co/vjZWFWzWEn
— लाइव लॉ हिंदी (@LivelawH) July 10, 2021
न्यायालयाने सांगितले की, एखाद्या व्यक्तीने राष्ट्रगीत थांबवण्याचा किंवा सभेत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर तो गुन्हा होऊ शकतो. ही कृती अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत दंडास पात्र आहे. यात ३ वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही, अशा शिक्षेचे प्रावधान आहे.
काय आहे प्रकरण ?
भारतीय सैन्याने पाकवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’चा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बानी (जिल्हा कठुआ) येथील शासकीय पदवी महाविद्यालयात २९ सप्टेंबर २०१८ या दिवशी एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यात राष्ट्रगीताच्या वेळी डॉ. तौसिफ अहमद भट उभे राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवण्यात आला होता.