भारताचे कंदहार येथील दूतावास बंद करण्यात आलेला नाही ! – राजनैतिक सूत्र

  • तालिबानने अफगाणिस्तानचा ८५ टक्के भूभाग व्यापल्याचे प्रकरण

  • ५० भारतीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी दूतावास सोडले !

तालिबानचा भारताला असलेला धोका लक्षात घेऊन सरकारने आता तालिबानलाच नष्ट करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत !

भारताचे कंदहार येथील दूतावास

काबुल – अफगाणिस्तानच्या कंदहार येथे असलेला भारतीय दूतावास ११ जुलै या दिवशी अचानक बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. यावर भारताच्या राजनैतिक सूत्रांनी  ‘भारत सरकारने अफगाणिस्तानातील कंदहार येथे असलेला भारतीय दूतावास बंद केलेला नाही’, असा खुलासा केला. सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचार्‍यांची संख्या न्यून करण्यात आली आहे. दूतावासात आता केवळ अत्यावश्यक सेवा चालूच रहातील. दूतावास बंद केल्याचे वृत्त चुकीचे आहे’, असे वृत्त ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेने दिले आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने चिनी प्रसारमाध्यम ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत ‘अफगाणिस्तानातील ८५ टक्के भाग आता तालिबानच्या (मूळ अरबी शब्द ‘तालिब.’ ‘तालिब’चा अर्थ ज्ञान मिळवण्याची अपेक्षा करणारे आणि इस्लामी इस्लामी कट्टरतावादावर विश्‍वास ठेवणारे  विद्यार्थी. ‘तालिब’चे अनेकवचन ‘तालिबान.’‘तालिबान’चा अर्थ ‘मागणारे’ असा होतो.) कह्यात आहे’, असा दावा केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर भारतीय दूतावास बंद झाल्याच्या वृत्ताला महत्त्व प्राप्त झाले होते.

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने ‘कंदहार आणि मजार-शरीफ येथील दूतावास बंद करण्याची कोणतीही योजना नसून तेथे पूर्वीप्रमाणेच व्यवस्था चालूच ठेवण्यात येईल’, असे सांगितले होते. तरीही अचानक ११ जुलैला कंदहार दूतावास रिकामे करून ते बंद करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या दूतावासातील ५० भारतीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी दूतावास सोडला असल्याचे सांगितले जात आहे. अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तेथे पुन्हा एकदा तालिबानचे वर्चस्व वाढत आहे.

तालिबानचे वर्चस्व वाढल्यास भारताला मोठा धोका !

भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंडजे म्हणाले, ‘‘तालिबानचे २० हून अधिक आतंकवादी गटांशी संबंध आहेत. या संघटना रशियापासून भारतापर्यंतच्या क्षेत्रात काम करतात. तालिबानचे वर्चस्व वाढल्यास भारताला मोठा धोका उद्भवू शकतो.’’