सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुमित्र सेवा संघाच्या वतीने कोरोनाविषयी जनजागृती
जिल्ह्यात ६० ठिकाणी लावले प्रबोधन करणारे फलक
सावंतवाडी – कोरोना महामारीचे संकट गेल्या दीड वर्षापासून कायम आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना काढण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न चालू आहेत. असेच प्रयत्न येथील सिंधुमित्र सेवा संघाच्या वतीने गेले दीड वर्ष चालू असून संघाच्या वतीने सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ले या तालुक्यांतील महत्त्वाच्या एकूण ६० ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत.
सिंधुमित्र सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे आणि सहकारी यांच्या संकल्पनेतून हे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांद्वारे जनतेला मुखपट्टी (मास्क) आणि सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतराचे पालन करणे, यांविषयी आवाहन करण्यासमवेतच कुठलेही लक्षण आढळले, तर डॉक्टरांच्या समादेशाने तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्या. त्यामुळे कुटुंबासह समाज सुरक्षित राहील. शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण करून घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.