सनातनचे साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांचा भाव अन् जवळीक यांचा दुरुपयोग करून धन गोळा करणार्या तथाकथित स्वामींपासून सावधान !
काही मासांपूर्वी एक स्वामी सनातनच्या आश्रमात आले होते. त्यासंबंधीचे वृत्त ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्या स्वामींचा निवास असलेल्या क्षेत्रातील सनातनचे काही साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी त्यांच्या दर्शनासाठी गेले. त्यातून झालेल्या ओळखीचा उपयोग करून त्या स्वामींनी साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्याशी जवळीक निर्माण केली अन् आता ते त्याचा उपयोग स्वत:चे प्रस्थ वाढवण्यासाठी आणि आर्थिक लाभ करून घेण्यासाठी करत असल्याच्या घटना ठिकठिकाणी घडत आहेत. या स्वामींविषयी लक्षात आलेल्या काही घटना पुढे दिल्या आहेत.
१. हे स्वामी त्यांच्या दर्शनासाठी जाणार्या सनातनच्या साधकांच्या ओळखीचा उपयोग करून ठिकठिकाणी बैठका घेत आहेत. ते या बैठकांमध्ये आरोग्य आणि आयुर्वेद यांची माहिती देतात. तसेच भजन आणि ध्यान करायला सांगतात. ‘नामजप करण्याची आवश्यकता नाही. नामजप होत नसेल, तर तुम्ही शांत बसा’, असे बैठकांना आलेल्या जिज्ञासूंना सांगतात.
२. स्वामींकडे जाणारे सनातनचे साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना ते ‘सनातन सांगते त्याच पद्धतीने साधना केली पाहिजे असे काही नाही’, अशा प्रकारे सनातनच्या साधनामार्गाविषयी नकारात्मकता निर्माण होईल, अशी वक्तव्ये करतात.
३. स्वामी ‘सनातनच्या साधकांना घर बांधण्यास सांगणे, कर्ज फिटावे यासाठी दैवी कोपाचे भय दाखवून विधी सांगणे, उपाय म्हणून घरात नारळ फिरवून तो फोडणे’, आदी करत आहेत.
४. संपर्कात आलेले साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना परराज्यातील आश्रम अन् देवळे यांच्या दर्शन सहलींना घेऊन जात आहेत.
५. एका साधकाच्या दुकानाला आग लागली. त्या वेळी या स्वामींनी ‘आग लागण्याच्या घटनेचा कालावधी मी पुढे ढकलला. या आगीत ३ जणांचा मृत्यू होणार होता; पण मी तो थांबवला’, असा दावा केला.
६. मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात कार्य करणार्या धर्मप्रेमींना ‘मंदिरे सरकारच्या कह्यात रहाणे चांगलेच आहे’, असे सांगून त्यांच्या मनात विकल्प निर्माण करणारी वक्तव्ये हे स्वामी करत आहेत.
७. हे स्वामी आश्रम बांधण्यासाठी साधकांकडून जमीन अर्पण स्वरूपात घेत आहेत.
८. या स्वामींनी त्यांच्या संपर्कात आलेले साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांचा ‘व्हॉट्सॲप’ या सामाजिक माध्यमावर गट बनवला आहे आणि त्या माध्यमातून ते अधिकाधिक लोकांना गोळा करण्याचा अन् त्यांना अनुयायी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सनातनच्या ओळखीचा उपयोग करून स्वत:चे प्रस्थ निर्माण करणे आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवणे, ही या स्वामींची कार्यपद्धत आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुणी सनातनचे साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या ओळखीचा दुरुपयोग करत असल्यास त्याच्या संपर्कात राहू नये. तसेच या स्वामींविषयी काही अनुभव आले असल्यास खालील पत्त्यावर कळवावेत. जेणेकरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे सोपे होईल.
सनातन संस्थेसाठी अर्पण देतांना ‘ते संस्थेच्या अधिकृत न्यासासाठी देत आहोत ना’, याची निश्चिती करा !‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारा जसा मोठा साधकवर्ग आहे, तसाच सनातनचे राष्ट्र-धर्म विचार मानणारा हितचिंतक असलेलाही मोठा वर्ग आहे. हा वर्ग सनातनचा हितचिंतक असला, तरी तो सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत नाही. त्यांची आध्यात्मिक श्रद्धा किंवा बांधीलकी निराळ्या आध्यात्मिक संस्था, गुरु किंवा संत यांच्याशी असू शकते. गुरुपौर्णिमेच्या काळात सर्वच जण गुरुकार्यासाठी अर्पण गोळा करतात. अशा वेळी ‘सनातनचे असे हितचिंतक गोळा करत असलेले अर्पण हे ‘सनातन संस्थेसाठीचे अर्पण आहे’, असा अपसमज होऊन त्यांनाच अर्पण दिले जाते’, असे अनुभव गेल्या वर्षी आले आहेत. अशा प्रकारचा भ्रम होऊ नये, यासाठी सनातन संस्थेच्या आध्यात्मिक कार्यासाठी किंवा आश्रमासाठी अर्पण द्यावयाचे असल्यास ‘ते संस्थेच्या अधिकृत न्यासासाठी देत आहोत ना’, याची निश्चिती करावी. आपण ही निश्चिती पावतीपुस्तकावरील नाव पाहून अथवा स्थानिक उत्तरदायी साधकांशी बोलून करू शकता. तसेच ‘सनातन संस्थेचे आहोत’, असे भासवून कुठल्या तरी निराळ्या आध्यात्मिक संस्थेसाठी धन किंवा भूमी अर्पण मागत असल्यास त्यांच्यापासून सावध रहावे, तसेच त्याविषयी त्वरित कळवावे, ही नम्र विनंती !’ नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१० संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१.’ |