मंदिरातील झीज झालेल्या देवाच्या मूर्तीवर लेपन अशास्त्रीय !

झीज झालेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर, तर कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याने रासायनिक द्रव्याचे लेपन केले. अध्यात्मशास्त्र आणि सांप्रदायिक परंपरा या दोन्ही दृष्टीकोनांतून मूर्तीवर लेपन करणे अयोग्य आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

रासायनिक संवर्धन प्रक्रियेपूर्वीची श्री महालक्ष्मीची मूर्ती

१. ‘लेपनासाठी वापरण्यात येणारी रासायनिक द्रव्ये रज-तमप्रधान असतात. त्यामुळे मूर्तीची सात्त्विकता अल्प होते.

२. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्र असतात, हा अध्यात्मशास्त्रातील एक मूलभूत सिद्धांत आहे. विठ्ठलाची मूर्ती आहे तशीच राखली, तर तिचे रूप तसेच राहिल्याने तिच्यात विठ्ठलाची शक्ती, म्हणजेच तत्त्व टिकून रहाते. तिच्यावर लेपन केले की, तिचे रूप पालटते. त्यामुळे तिच्यातून बाहेर पडणारे विठ्ठलतत्त्व अल्प प्रमाणात बाहेर पडते. यामुळे भक्तांना विठ्ठलतत्त्व अल्प प्रमाणात मिळते.

३. मूर्तीची झीज झाली, तर तिच्यातून देवतेचे तत्त्व अल्प प्रमाणात मिळते. असे होऊ नये; म्हणून धर्मात तत्त्वोत्तारण विधी करून तिच्यातील देवतेचे तत्त्व काढून तिच्या जागी नवीन मूर्ती ठेवून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यास सांगितलेले आहे. लेप लावण्यास सांगितलेले नाही.

४. मूर्ती ही काही पुराणवस्तू खात्याच्या अखत्यारितली वस्तू नाही की, त्याने तिच्यावर काहीही प्रक्रिया करावी.

५. मुसलमान कधी काबा येथील दगडाची झीज झाली म्हणून त्यावर काही करू देतील का ? मुसलमानांना जे समजते, ते अतिशहाण्या हिंदूंना का समजू नये ?

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्याच्या संदर्भात मंदिरांतील पुजारी, सरकार, धर्मशास्त्राचे तथाकथित अभ्यासक, तसेच प्रसारमाध्यमे यांचे अज्ञान

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. ‘श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्याची पद्धत धर्मशास्त्राला अनुसरून नसतांनाही विविध दूरचित्रवाहिन्या आणि प्रसारमाध्यमे यांमधून ही प्रक्रिया याेग्य कशी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. सरकारनेही या प्रक्रियेला संमती दिली. मंदिरे सरकारच्या कह्यात गेल्यामुळेच असे धर्मशास्त्रविरोधी निर्णय घेतले जात आहेत. मशीद किंवा चर्चच्या संदर्भातील एखाद्या निर्णयात अशी ढवळाढवळ करण्याचे धाडस प्रशासन किंवा प्रसारमाध्यमे यांनी केले असते का ?

२. हिंदु जनजागृती समिती धर्मशास्त्राचे महत्त्व पटवून देत असतांनाही हे धर्मशास्त्र जाणून न घेता या देवालयातील श्रीपूजक आणि धर्मशास्त्राचे तथाकथित अभ्यासक यांनीही मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्याचाच आग्रह धरला. पुजार्‍यांना शास्त्रच माहीत नसेल, तर ते मंदिरातील एखादा विधी शास्त्रोक्त पद्धतीने कसा करणार ? असे पुजारी हिंदूंना धर्मशास्त्र कधी शिकवू शकतील का ? यावरून पुजारी काय किंवा धर्मशास्त्राचे तथाकथित अभ्यासक काय, या कोणालाही धर्मशास्त्राचे ज्ञान नाही किंवा त्यांची धर्मशास्त्र जाणून घेण्याची इच्छाच नाही, असे दिसते.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले