साधकांनो, घरच्यांविषयी घडणार्या प्रसंगावर वेळीच साधनेचे योग्य दृष्टीकोन घेऊन अशा विचारांमध्ये व्यय होणारी शक्ती वाचवा !
१. प्रसंग
‘एका साधिकेने आढावा देत असतांना सांगितले की, त्यांच्या घरातील साधिका मुलगी त्यांना म्हणाली, ‘‘तू स्वभावदोष निर्मूलन सारणीमध्ये घरातील प्रसंग लिहीत जाऊ नकोस किंवा व्यष्टी साधनेचा आढाव्यात त्याविषयी चर्चाही करू नकोस. घरातील गोष्टी घरातच राहिलेल्या बर्या. याविषयी आपण आपापसांत बोलूया.’’
२. योग्य दृष्टीकोन
अ. समाजात वावरतांना किंवा आश्रमात सेवा करतांना बराच वेळ आपण ‘मनाची नाही, तर जनाची लाज बाळगून’ योग्य वागण्याचा प्रयत्न करत असतो; परंतु घरी मात्र आपण अशा मर्यादांचे पालन न करता स्वतःतील अनेक स्वभावदोषांचे प्रकटीकरण करत वागत असतो अन् घरातील मंडळींनाही त्याची सवय झाल्याने ते ती प्रकृती स्वीकारून तिच्याशी त्याप्रमाणे वागत असतात. अशा वागण्यामुळे अन्य कुठेही प्रकट न झालेले स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू घरात प्रकट होत असूनही त्यावर साधनेच्या दृष्टीने योग्य प्रक्रिया होत नाही.
आ. घरातील मंडळींशी वागतांना साधनेच्या दृष्टीकोनातून वागण्याऐवजी बर्याच वेळा व्यावहारिक दृष्टीकोनातून वागले जाते. त्यामुळे ‘आपण वागत आहोत, ते अयोग्य आहे’, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. घरातील व्यक्तींसमवेत बरेच प्रसंग घडत असतात. त्याचा ताण मनावर रहात असल्याने बरेच विचार मनामध्ये सतत येत रहातात आणि त्याचा साधनेवर परिणामही होत असतो. वेळीच त्या प्रसंगांवर योग्य दृष्टीकोन घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केल्यास विचारांमध्ये व्यय होणारी शक्ती वाचते.
इ. साधकांनी घरातील आपल्या वागण्या-बोलण्यातून होणार्या चुका शोधून प्रसंग व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगून त्यावर योग्य दृष्टीकोन घेणे आवश्यक आहे. काही प्रसंग जर आपण आढाव्यात सर्वांसमोर सांगू शकत नसू, तर असे प्रसंग आढावा संपल्यावर आढावासेवकांशी वैयक्तिकरित्या बोलून घेऊ शकतो.’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.३.२०२०)