नवधाभक्ती – एक विश्लेषण
अध्यात्मविषयक बोधप्रद ज्ञानामृत…
।। श्रीकृष्णाय नमः ।।
भक्तीमार्गात नवधाभक्तीचा उल्लेख येतो. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन (टीप), हे ते भक्तीचे नऊ प्रकार. त्यातील
१. पहिले तीन प्रकार
श्रवण, कीर्तन, स्मरण. ह्यांच्यात ईश्वराचे गुणगान आणि जप हे मुख्य आहेत. ह्या भक्तींमध्ये अधिक बाह्य वस्तू आवश्यक नसून ह्या भक्ती अधिक आंतरिक आहेत.
२. दुसरे तीन प्रकार
पादसेवन, अर्चन, वंदन. ह्या भक्ती मूर्ती, प्रतिमेवर आधारित आहेत. ह्या अधिक बाह्य आहेत.
३. शेवटचे तीन प्रकार
दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. ह्यांच्यात बाह्य वस्तूंची आवश्यकताच नसते. ह्यांच्यात केवळ आंतरिक भाव महत्त्वाचा. भक्तीमार्गात भावाचे महत्त्व असते.
पहिल्या दोन प्रकारच्या भक्तीसुद्धा भावपूर्ण केल्या जाऊ शकतात; पण त्यांच्यात इतर क्रियांकडेही लक्ष द्यावे लागते. तसेच दिवसभर श्रवण आणि कीर्तन करू शकत नाही, दिवसभर पादसेवन, पूजा करू शकत नाही; पण दिवसभर दास असण्याची, शरणागतीची भावना मनात राहू शकते.
टीप : ‘आत्मनिवेदन’ ह्या शब्दावरून काही जणांना वाटते की ह्यात ईश्वराला काही तरी सांगायचे असते. येथे ‘आत्मनिवेदन’चा अर्थ ‘सांगणे’ असा नसून ‘पूर्ण शरणागती’ असा आहे. आत्मसमर्पण, स्वतःसह आपले सर्वस्व ईश्वराला अर्पण करणे, असाही त्याचा अर्थ आहे.
– अनंत आठवले (४.११.२०२०)
(संदर्भ : लवकरच प्रकाशित होणार्या ‘पू. अनंत आठवले लिखित ‘साधनेच्या विविध अंगांविषयी मार्गदर्शन !’ या ग्रंथातून)
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।