राज्यातील कृषी तंत्र निकेतनच्या ६ सहस्र ४२० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात !

भाजयुमोकडून कृषी विद्यापिठात आंदोलन

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्याशी चर्चा करताना

अकोला – ‘कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ६ सहस्र ४२० विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश देण्यात यावा’, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने ९ जुलै या दिवशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठात आंदोलन केले. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजयुमो पदाधिकार्‍यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले आणि कृषी अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदिवे यांच्यासमवेत चर्चा केली. त्यांनी मागण्या पूर्ण करण्याविषयी लेखी आश्वासन दिले आहे.

१. कृषी तंत्र निकेतन वर्ष २०१८-२०२१ च्या विद्यार्थ्यांना ‘कृषी पदवी’ या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, अशा विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या पहिल्या आणि दुसर्‍या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे.

२. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या आधारावर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे, त्यांच्या शिक्षणात खंड पडणार आहे.

३. प्रवेश माहिती पुस्तकामध्ये कृषी पदवीच्या थेट पहिल्या आणि दुसर्‍या वर्षात प्रवेश नसल्याची माहिती असली, तरी काही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश पुस्तिका देत नाहीत.

४. कृषी पदवीला प्रवेश मिळत नसल्याने हे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. त्यांचे ३ वर्षांचे शैक्षणिक वर्ष आणि आर्थिक हानी होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.