५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अकोला येथील चि. मल्हार विक्रांत भागवत (वय १ वर्ष) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. मल्हार विक्रांत भागवत एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
उद्या आषाढ शुक्ल पक्ष प्रतिपदा (११.७.२०२१) या दिवशी चि. मल्हार विक्रांत भागवत याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे अन् त्याच्या कुटुंबियांना त्याच्या जन्मानंतर जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
चि. मल्हार विक्रांत भागवत याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. गर्भधारणेपूर्वी
‘आधुनिक वैद्यांनी मला सांगितले होते, ‘‘तुम्हाला ओव्हरीज्चा (अंडाशयाचा) विकार असल्यामुळे वैद्यकीय उपचार घेतल्यावरच मूल होऊ शकेल’’; परंतु प्रत्यक्षात उपचार न घेताही मला गर्भधारणा झाली.
२. गर्भधारणेनंतर आईला स्वतःमध्ये जाणवलेले पालट
अ. माझे मन शांत झाले.
आ. ‘तेलकट किंवा तिखट खायला नको. केवळ सात्त्विक आहारच घ्यावा’, असे मला वाटत होते.
इ. माझ्याकडून घरातील सर्व कामे सेवा म्हणून होत होती. त्यामुळे मला आनंद मिळत होता.
ई. माझ्याकडून स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवली जात होती. त्यामुळे माझ्या मनातील प्रतिक्रिया न्यून झाल्या.
उ. ‘आध्यात्मिक ग्रंथ आणि संतांचे चरित्रग्रंथ वाचावेत’, असे मला वाटत होते. या कालावधीत मी ‘हरिविजय’, ‘शक्तिविजय’ आणि अन्य आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन केले.
ऊ. या दिवसांत माझा नामजप अंतर्मनातून आणि भावपूर्ण होत होता. त्यामुळे ‘मी नामजप करत नसून गर्भातील जीवच नामजप करत आहे’, असे मला वाटत होते.’
– आधुनिक वैद्या (सौ.) अमृता विक्रांत भागवत (चि. मल्हारची आई), अकोला
३. जन्मापूर्वी
‘अमृताला गर्भधारणा झाल्याचे मला समजल्यावर ‘तिच्या सासरी साधनेसाठी पूरक वातावरण असल्यामुळे ‘ईश्वरी राज्यात साधना करण्यासाठी सात्त्विक बाळ जन्माला येईल’, असे वाटून माझा भाव जागृत होत होता.’ – आधुनिक वैद्या (सौ.) समिधा रमेश वरूडकर (चि. मल्हारची आजी (आईची आई)), अमरावती
४. जन्म ते ५ मास
अ. ‘बाळाच्या जन्मानंतर त्याला प्रथम पाहिल्यावर मला पुष्कळ शांत वाटले आणि ‘बाळ गुरुकार्यासाठीच जन्माला आले आहे’, असे वाटले.
आ. मल्हार ५ मासांचा झाल्यावर मी चिकित्सालयात जाऊ लागले. तेव्हापासून तो त्याच्या आजी-आजोबांच्या (वडिलांच्या आई-वडिलांच्या) समवेत आनंदाने रहातो. तो रडून त्यांना त्रास देत नाही.
५. वय ६ मास ते १ वर्ष
अ. मी मोठ्याने नामजप किंवा जयघोष करत असतांना मल्हार त्याला प्रतिसाद देतो.
आ. ‘श्रीकृष्ण कुठे आहे ?’ किंवा ‘गुरुदेव कुठे आहेत ?’, असे विचारल्यावर तो लगेच श्रीकृष्णाचे चित्र किंवा गुरुदेवांचे छायाचित्र दाखवतो.
इ. ‘मल्हारला भरवतांना तो जेवत नसेल, तर त्याला ‘हा प्रसाद श्रीकृष्णाने किंवा गुरुदेवांनी पाठवला आहे’, असे सांगितल्यावर तो पटकन खातो.’
– आधुनिक वैद्या (सौ.) अमृता विक्रांत भागवत
६. चि. मल्हारच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
अ. ‘मल्हारची आठवण झाली की, माझे मन निर्विचार होते. ‘त्याच्या डोळ्यांकडे सतत बघत रहावे’, असे मला वाटते.’ – आधुनिक वैद्या (सौ.) समिधा रमेश वरूडकर
आ. ‘मला मणक्याचा त्रास आणि संधिवात आहे. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी मला ‘एक किलोही वजन उचलू नका’, असे सांगितले आहे; परंतु मी मल्हारला कडेवर घेतल्यावर मला त्याचे वजन जाणवत नाही किंवा मला काही त्रास होत नाही.’
– सौ. अलका गोपाळराव भागवत (चि. मल्हारची आजी (वडिलांची आई))
इ. ‘मी चिकित्सालयातून घरी आल्यावर कितीही थकलेला असलो, तरी मल्हारला नुसते जवळ घेतल्यावर माझा थकवा दूर होतो.’ – आधुनिक वैद्य विक्रांत गोपाळराव भागवत (चि. मल्हारचे वडील)
ई. ‘मल्हारला जवळ घेतल्यावर माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मकता वाढते.’ – अधिवक्त्या (सौ.) प्राजक्ता गिरीश जामोदे (चि. मल्हारची मावशी)
उ. ‘आम्ही दोघे पत्नी वरूडकरकाका-काकूंना भेटायला गेलो होतो. त्याच वेळी मल्हार त्याच्या आई-वडिलांच्या समवेत तिथे आला. मल्हारला पहाताक्षणीच आम्हाला उत्साह आणि चैतन्य जाणवले. त्याच्याकडे पाहून आम्हाला आनंद वाटला, तसेच वातावरणातही एकदम सकारात्मक पालट जाणवला.’
– श्री. अमोल वानखडे आणि सौ. आनंदी वानखडे, अमरावती
ऊ. ‘वयोमानामुळे मला सलग टंकलेखनाला बसता येत नाही; परंतु मला मल्हारच्या गुणवैशिष्ट्यांचे टंकलेखन सलग बसून करता आले. त्या वेळी माझ्या डोळ्यांनाही त्रास झाला नाही. सेवा करतांना मला आनंद आणि चैतन्य जाणवत होते.’
– श्री. श्याम राजंदेकर, अकोला
७. स्वभावदोष
‘हट्टीपणा’
– आधुनिक वैद्या (सौ.) अमृता विक्रांत भागवत (४.६.२०२१)
|