शत्रूशी लढण्यासाठी सिद्ध केलेल्या भारतीय बनावटीच्या नवीन आव्हानात्मक बोटी !
१. पेंगाँग सो तलावामध्ये नवीन बोटी तैनात केल्यामुळे भारतीय सैन्याची स्थिती अधिक मजबूत होईल !
‘भारतीय सैन्य पेंगाँग सो तलावाच्या भागात बोटी तैनात करणार आहे. पेंगाँग सो तलाव म्हणजे पूर्व लडाखमध्ये १५ सहस्र फूट उंचीवर असलेले एक तळे आहे. ते अनुमाने १३० किलोमीटर लांब असून २ ते ३ किलोमीटर रुंद आहे. या तलावाचा ३३ टक्के भाग भारताकडे असून उर्वरित ६७ टक्के भाग चीनकडे आहे. या तलावाच्या आजूबाजूला मोठ्या पर्वतरांगा आहेत. त्यावरून पडणारे पाणी तलावामध्ये येते. पूर्वी पेंगाँग सो तलावाच्या उत्तर किनार्यावर असलेल्या ‘फिंगर’ भागात भारतीय सैन्याची चिनी सैन्याशी थोडी धक्काबुक्की आणि लढाई झाली होती. सध्या तेथे भारतीय सैन्य आणि थोड्या अंतरावर चिनी सैन्य तैनात आहे.
पेंगाँग सो तलावामध्ये तैनात करण्यात येणार्या बोटी गोवा शिपयार्डमध्ये बांधल्या जात आहेत. भारतीय सैन्याला अनुमाने २० ते २५ बोटी मिळणार आहेत. त्यातील काही बोटी तैनातही झालेल्या आहेत. भारतीय सैन्याकडे पूर्वी ज्या बोटी होत्या, त्यांना ‘बाऊट’ (बोट असॉल्ट युनिव्हर्सल टाईप) म्हटले जाते. त्यांचा वापर भारतीय सैन्य आणि त्यांचे ‘इंजिनीयर्स रेजिमेंट’ (मूलभूत लढाऊ अभियंत्यांचे युनिट) करायचे. त्या लहान आणि हलक्या प्रकारच्या बोटी होत्या. आता सिद्ध करण्यात येणार्या बोटी अधिक मजबूत आणि वजनदार आहेत. त्यांची लांबी ३५ फूट असून त्यांमध्ये २० ते २५ सैनिक राहू शकतील, अशी त्यांची क्षमता आहे, तसेच त्या वेगवानही आहेत.
२. नवीन बोटींमुळे भारतीय सैन्याला होणारे विविध लाभ !
२ अ. शत्रूच्या बोटींना प्रत्युत्तर देण्याची क्षमता : भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या बोटींचा भारताला लाभ होऊ शकतो. अनेक वेळा चिनी सैन्यांच्या बोटी भारतीय हद्दीत येऊन भारतीय बोटींना टक्कर देण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत या बोटी त्यांना चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर देऊ शकतील. सध्या या ठिकाणी गस्तीला जातांना शस्त्रांचा वापर करता येत नाही; पण पुढील काळात आवश्यकता पडली, तर या बोटींवर शस्त्रांचा वापर करता येईल.
२ आ. शत्रूच्या सैन्यावर लक्ष ठेवण्यास साहाय्य : या भागामध्ये नवीन बोटी तैनात झाल्यामुळे भारताला चिनी सैन्यावर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. सैन्याला नियमितपणे गस्तही घालता येईल. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास सैन्याला आवश्यक ते साहाय्यही करता येईल.
२ इ. दोन्ही किनारी भागांवर लक्ष ठेवता येणे शक्य : पेंगाँग सो तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनार्यांवरील दोन्ही भागांवर लक्ष ठेवता येईल. पूर्वी दक्षिण पेंगाँग सो तलावाच्या भागात भारतीय सैन्याने आक्रमक कारवाई केली होती. तेव्हा भारतीय सैन्य कैलास पर्वतावर चढले होते. त्यामुळे चीनच्या उरात धडकी भरली होती. सध्या आपण तेथून खाली आलेलो आहोत.
३. चीनच्या कोणत्याही आक्रमक कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सिद्ध आहे !
येणार्या काळात चीनच्या आक्रमक कारवाया चालूच रहाणार आहेत. त्यामुळे या भागात भारतीय सैन्य एका मोठ्या लढाईसाठी सिद्ध आहे. विविध प्रकारची शस्त्रे, सामुग्री आणि बोटी त्या ठिकाणी तैनात केल्या जात आहेत. तेथे एक ब्रिगेड सैन्य वाढवण्यात आले आहे. भारतीय सैन्य कुठल्याही युद्धजन्य परिस्थितीत लढायला सिद्ध आहे; परंतु त्यासाठी त्यांच्या मागे संपूर्ण देशाने उभे रहायला हवे. भारत सैन्य आधुनिकीकरणामध्ये पुष्कळ मागे आहे.
त्यामुळे पुढील काळात भारताचे संरक्षण अंदाजपत्रक वाढवणे आवश्यक आहे. सध्या कोरोना महामारी किंवा अन्य कारणांमुळे अंदाजपत्रक तूर्तास वाढवणे तरी शक्य नाही. अशाही स्थितीत भारताला चीनशी लढावे लागेल आणि तेच भारतीय सैन्य करत आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.