गुलामगिरीची मानसिकता !
सध्या विदेशात असणार्या भारतातील हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनम कपूर यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘मला इथलं स्वातंत्र्य आवडतं. मी स्वत: स्वयंपाक करते, घराची स्वच्छता करते. बाजारातून किराणा खरेदी करते.’ अर्थात् चित्रपटातील कलाकारांसाठी ट्वीट करत रहाणे हा एकप्रकारे त्यांचा व्यवसाय आणि प्रसिद्धी मिळवणे याचाच भाग असतो; पण जेव्हा हे कलाकार त्यामध्ये राष्ट्र किंवा धर्म यांसारख्या विषयाशी संबंधित वक्तव्ये करतात, तेव्हा ती गोष्ट केवळ वैयक्तिक स्वरूपाशी संबंधित रहात नाही. चित्रपट कलाकार या वलयांकित व्यक्ती असल्याने त्या समाजाला आणि विशेषतः युवा पिढीला मोठ्या प्रमाणात प्रभावित करत असतात. अनेक जण त्यांचे किंवा त्यांच्या विचारांचे अनुयायी होतात. चित्रपट कलाकारांचे पुतळे उभारून किंवा त्यांची मंदिरे बांधून त्यांची पूजाही केली जाते. भारतीय समाजात तर त्यांचा प्रभाव किती प्रमाणात आहे, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे वलयांकित व्यक्तींनी प्रसारमाध्यमांवर कुठलेही साधे विधान दायित्वाने करणे आवश्यक असते.
अभिनेत्री सोनम कपूर यांनी केलेले वरील विधान वरकरणी साधे वाटले, तरी त्यांना ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांवर प्रतिसाद मिळाला आहे, त्यावरून ‘देशातील सामान्य जनतेमध्येही जे देशप्रेम असते; परंतु देशातील पैसा ओरबाडून विदेशात जाणार्या वलयांकित कलाकारांमध्ये मात्र ते नसते कि काय ?’ असेच वाटते. सोनम यांच्या ट्वीटवर ‘नेटकर्यां’नी म्हटले आहे, ‘भारतात काय नोकर तुझ्या घरात बळजोरीने घुसले होते का ?’ कुणाला वाटेल की, वक्तव्य साधेच आहे, त्यात एवढे काय झाले ?; परंतु काही ना काही कारणाने ‘भारतात स्वातंत्र्य नाही’, ‘भारतात हे नाही, ते नाही’ आणि ‘विदेशात मात्र ते आहे’, असेच काहीतरी यातून सुचवायचे असते. भारतात ‘श्रीमंत लोकांनी घरकामे करू नयेत’, असा काही नियम नाही. विदेशात नोकर मिळणेच कठीण आणि परवडणारे नसल्याने बहुसंख्य त्यांची कामे स्वतःच करतात. भारतीय प्रेक्षकांच्या पैशांवर मोठे झालेले हे कलाकार विदेशात जाऊन परत भारतालाच नावे ठेवत असतील, तर ते कितपत योग्य आहे ? खाल्ल्या मिठाला जागावे’, असे म्हटले जाते. अर्थात श्रीमंतीचा गर्व असणार्यांना संस्कृती आणि संस्कार यांच्याशी कसले आले आहे देणे-घेणे ? ‘विदेशातील प्रत्येक गोष्ट भारतापेक्षा चांगली’, असा जो संस्कार भारतियांवर इंग्रजांच्या काळापासून झाला आहे, त्याचाच हा परिपाक आहे. तीच ही गुलामगिरीची मानसिकता आहे. विदेशात काम करावे लागले, तर ते चांगले आणि भारतात घरकाम करायला ‘प्रसिद्धी’ची अडचण वाटते. असो.
चाहत्यांचे कर्तव्य !
आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची देणगी मिळाली असल्याने काय वाटेल ते बोलायचे, हे असेच चालू आहे. सोनम कपूर यांना यापूर्वीही त्यांच्या काही वादग्रस्त विधानांवरून टीकेला सामोरे जावे लागले होते. घरकाम आणि किराणा आणणे येथपर्यंत वक्तव्ये असतात, तोपर्यंत तरी ठीक; मात्र हे कलाकार जेव्हा ‘देशात असहिष्णुता वाढत आहे’, यासारखे ट्वीट करतात, तेव्हा मात्र राष्ट्रद्रोह केल्याप्रमाणेच ती विधाने घातक ठरतात. पैशांव्यतिरिक्त देशभक्तीशी काही देणे-घेणे नसणार्या चित्रपट कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचणारा आणि त्यांना विनाकारण महत्त्व देणारा वर्गही याला तितकाच उत्तरदायी आहे. त्याचप्रमाणे ‘आपण प्रसिद्ध आहोत’, ‘आपल्याला पुष्कळ चाहते आहेत’, याची डोक्यात हवा गेल्याने वाटेल ते बरळणार्या कलाकारांनी ‘सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे’, ‘समाजभान जागृत ठेवले पाहिजे’, याची जाणीव ठेवावी. कलाकार जेव्हा हे विसरतात, तेव्हा त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकून त्यांना याची जाणीव करून दिली पाहिजे !