‘इनोव्हेशन इन एज्युकेशन’ योजनेचे सदिच्छा दूत म्हणून रणजितसिंह डिसलेगुरुजी यांची निवड !

रणजितसिंह डिसलेगुरुजी

मुंबई – राज्य सरकारकडून राबवण्यात येणार्‍या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसलेगुरुजी यांची ‘सदिच्छा दूत’ म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र राज्य सरकारच्या कौशल्य विकास’ आणि ‘रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी’ यांच्या वतीने ही नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या ‘स्टार्टअप धोरण २०१८’च्या प्रभावी कार्यवाहीसाठी महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील सर्व घटकांसाठी ‘स्टार्टअप’ आणि नाविन्यता क्षेत्राशी संबंधित विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातात.

सदिच्छा दूत म्हणून डिसले गुरुजी इनोव्हेशन सोसायटीचा विकास होण्यासाठी तळागाळातील विद्यार्थी, नव उद्योजक, प्राध्यापक, स्टार्टअप यांच्या पर्यंत योजनांचा प्रसार आणि प्रचार करणार आहेत. सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर’हा पुरस्कार प्राप्त झाला होता. लंडनमधील ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली होती. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ सहस्रांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे.