कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारीसाठी दळणवळण बंदीचे नियम पाळून अनुमती द्या ! – वारकरी आणि भाविक यांचे निवेदन

निवेदन देण्यासाठी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमलेले वारकरी आणि भाविक

कोल्हापूर – सलग १८ वर्षे चालू असलेल्या कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारीसाठी दळणवळण बंदीचे नियम पाळून अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन वारकरी आणि भाविक यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले. करवीर तहसीलदार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून बिनखांबी गणेश मंदिर ते खंडोबा तालीमपर्यंत पायी दिंडी त्यानंतर वाहनातून अनुमती देण्यात यावी. या वेळी दिंडीप्रमुख ह.भ.प. आनंदराव लाड महाराज, अधिवक्ता राजेंद्र किंकर, अध्यक्ष बाळासाहेब पवार, पत्रकार राजेंद्र मकोटे, संभाजी पाटील, दीपक गौड यांसह अन्य उपस्थित होते. लवकरच विठ्ठल मंदिरात बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवली जाईल, असे ह.भ.प. आनंदराव लाड महाराज आणि बाळासाहेब पवार यांनी सांगितले.