परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणारे ठाणे येथील सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे)!

ठाणे येथील सनातनचे  १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांनी वैशाख अमावास्या (१०.६.२०२१) या दिवशी देहत्याग केला. पू. सामंतआजोबा यांचे ९.७.२०२१ या दिवशी मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी संत आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

पू. सदाशिव सामंत

‘मला देवद (पनवेल) येथील आश्रमात पू. सामंतआजोबांचा ४ वर्षे सहवास लाभला. आम्ही दोघे अडीच वर्षे सकाळी ७ वाजता आश्रमात होणार्‍या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला जायचो. तेथे आमची जवळीक झाली. काही वेळा या वर्गाला कुणी आले नाही, तरी आम्ही दोघे असायचो.

पू. शिवाजी वटकर

१. उत्साही आणि आनंदी

पू. आजोबा नेहमी उत्साही आणि आनंदी असायचे. परात्पर गुरु पांडे महाराज त्यांना म्हणायचे, ‘‘तुमचे नाव ‘सदाशिव’ऐवजी ‘सदानंद’ ठेवूया.’’

२. ते स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात क्षात्रभावाने व्यायामप्रकार करायचे. ते लाठीकाठीचे प्रकारही करायचे.

३. पूर्वी ते ‘शर्ट आणि पँट’ घालत असत. त्यांना सदरा आणि पायजमा घालण्याचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी तसा पालट केला.

४. राष्ट्राभिमानी आणि धर्माभिमानी

आम्ही धर्मांध आणि पुरोगामी यांच्याविषयी चर्चा करत असतांना त्यांचा राष्ट्राभिमान अन् धर्माभिमान जागृत होत असे. ते पाहून मला ‘धर्मरक्षणासाठी कृती केलीच पाहिजे’, अशी प्रेरणा मिळायची.

५. अमेरिकेत असतांनाही नियमितपणे व्यष्टी आणि समष्टी साधना करणे

ते काही मास अमेरिकेत रहाणार्‍या त्यांच्या मुलीकडे गेले होते. ते तेथेही पहाटे २.३० वाजता उठून वैयक्तिक आणि समष्टीसाठी नामजप, तसेच सेवा करायचे. ते स्वभावदोष-निर्मूलन सारणी लिहायचे. ते भाववृद्धी सत्संगाला उपस्थित असायचे. ते अमेरिकेत असतांनाही सकाळी एकटेच प्रशिक्षणवर्गातील व्यायामप्रकार करायचे. त्या वेळी ते मोठ्याने ‘हर हर महादेव ।’ आणि ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ अशा घोषणा द्यायचे. ते मे २०१९ मध्ये अमेरिकेहून परत आल्यावर त्यांनी मला याविषयी सांगितले.

६. पू. सामंतआजोबा आणि माझ्यामध्ये वृद्धींगत झालेली आध्यात्मिक मैत्री !

त्यांच्यातील ‘मनमोकळेपणा आणि आपुलकीचे वागणे’, या गुणांमुळे आमची मैत्री वृद्धींगत झाली. १६.७.२०१९ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुकृपेने मला १०२ वे समष्टी संत म्हणून घोषित केले. तेव्हा पू. आजोबांना फार आनंद झाला. त्यानंतर ९.८.२०१९ या दिवशी पू. सामंतआजोबांना सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील १०३ वे संत म्हणून घोषित करण्यात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्ही एकापाठोपाठ एक संत झाल्याचे घोषित झाले. प्रशिक्षणवर्गातील वर्गमित्र संत झाल्याविषयी मला फार आनंद झाला. गुरुकृपेने मला पू. आजोबांना पुष्पहार घालून, तसेच श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या सन्मानाच्या दिवशी त्यांच्याकडे चित्रीकरणासाठी योग्य असा सदरा नव्हता. त्या वेळी मी माझा सदरा त्यांना दिल्यावर तो त्यांनीच शिवून घेतल्यासारखा त्यांना मापात बसला. आम्हा दोघांनाही त्याचा आनंद झाला.

७. कृतज्ञताभाव

देवद आश्रमात असतांना काही वर्षे आम्ही दोघे एकमेकांसमोर बसून प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करायचो. प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करतांना ते नेहमी दोन्ही हात जोडायचे आणि नंतर जोडलेले हात वर नेऊन कपाळाला लावायचे अन् नम्रतेने कृतज्ञता व्यक्त करायचे. ते प्रत्येक कृती करतांना अशाच प्रकारे कृतज्ञता व्यक्त करायचे.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले अंतिम सत्य आहे’, असे समजून ते त्यांचे आज्ञापालन करत. कोणताही विषय निघाला, तरी ते विशेष काही न बोलता हात जोडून ‘परम पूज्य काळजी घेणारच आहेत’, असे श्रद्धापूर्वक बोलून सतत कृतज्ञता व्यक्त करायचे. त्यांना पाहूनच माझा कृतज्ञताभाव जागृत होत असे. या वर्षी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडचणी आल्यावर आणि मोठे प्रसंग घडल्यावरही ते शांतपणे त्यांना सामोरे गेले. तेवढ्याच शांतपणे आणि धिराने त्यांच्या पत्नी श्रीमती दिनप्रभा सामंत या प्रत्येक प्रसंगाला सामोर्‍या गेल्या. पू. आजोबांनी देहत्याग केल्यावरही त्या अत्यंत स्थिर होत्या. त्या दोघांमध्येही परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञताभाव आणि शरणागती होती.

९. कृतज्ञता आणि प्रार्थना

पू. आजोबांनी देहत्याग केल्यावर ‘मी एक संतमित्र स्थुलातून गमावला’, याचे मला वाईट वाटले. त्यांच्याकडून मला ‘नम्रता, सातत्य, चिकाटी, निर्मळता, प्रांजळपणा’ आदी गुण शिकायला मिळाले. त्यांच्याकडून मला साधनेतील अनेक कृतीशील गोष्टी शिकायला मिळाल्याविषयी माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘पू. सामंतआजोबांची या पुढेही आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.६.२०२१)