टाळ-मृदुंगाच्या निनादात रंगला संत सोपानदेवांचा पालखी प्रस्थान सोहळा !
सासवड (पुणे), ८ जुलै – टाळ-मृदुंगाचा निनाद, निवडक दिंड्या, मोजके वारकरी यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात श्री संत सोपानदेवांच्या पादुका पालखीत ठेऊन ‘श्रीं’चा पालखी प्रस्थान सोहळा ६ जुलै या दिवशी दुपारी ४ वाजता सासवडला देऊळवाड्यात झाला. मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मंदिरात विसाव्याला थांबली. या वर्षीही गतवर्षीप्रमाणेच बसमधूनच निवडक वारकर्यांसमवेत श्री संत सोपानदेवांच्या पादुका घेऊन आषाढ वारी होईल.
६ ते १८ जुलै या कालावधीत पालखीचा मुक्काम समाधी मंदिरात सासवडलाच असेल. या दिवसात नित्य काकड आरती, भजन, हरिपाठ, कीर्तन, शेजारती आणि जागर मंदिरातच होतील. आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे १९ जुलै या दिवशी सरकारने दिलेल्या २ बसमधून ‘श्रीं’च्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतील.