पिंपरी (पुणे) येथील २ ‘सिटी स्कॅन सेंटर’ने रुग्णाकडून घेतलेली अतिरिक्त रक्कम परत मिळवून देण्यात हिंदु जनजागृती समितीप्रणीत आरोग्य साहाय्य समितीला यश !
जनतेची अशा प्रकारे होणारी लूट रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेणे अपेक्षित आहे !
पिंपरी (पुणे) – कोरोनाच्या काळात पिंपरी (पुणे) येथील ‘शार्प डायग्नोस्टिक प्रायव्हेट लि. (मेगाव्हिजन स्कॅन्स)’ आणि ‘न्यूक्लिअस डायग्नोस्टिक्स’ या दोन ‘सिटी स्कॅन सेंटर’नी एका रुग्णाकडून घेतलेली एकूण ५ सहस्र ५०० रुपयांची अतिरिक्त रक्कम त्या रुग्णाला परत मिळवून देण्यात हिंदु जनजागृती समितीप्रणीत आरोग्य साहाय्य समितीला यश आले.
१. पहिल्या घटनेत पिंपरी येथील ‘न्यूक्लिअस डायग्नोस्टिक्स’ यांनी श्री. विश्वनाथ अवघडे यांचे ‘सिटी स्कॅन’ करण्यासाठी २ सहस्र ५०० रुपयांऐवजी ३ सहस्र रुपये, म्हणजे ५०० रुपये अधिक आकारले होते. या संदर्भात श्री. अवघडे यांनी आरोग्य साहाय्य समितीकडे साहाय्य मागितले. समितीने महाराष्ट्र सरकारच्या २४ सप्टेंबर २०२० या दिवशीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत कोरोना रुग्णांच्या ‘सिटी स्कॅन’साठी २ सहस्र ५०० रुपये घेण्याचा नियम असल्याविषयी श्री. अवघडे यांना अवगत केले. समितीने केलेल्या मार्गदर्शनानुसार श्री. अवघडे यांनी ‘न्यूक्लिअस डायग्नोस्टिक्स’कडे तक्रार केली असता ‘न्यूक्लिअस डायग्नोस्टिक्स’कडून त्यांना अतिरिक्त ५०० रुपये परत करण्यात आले.
२. दुसर्या घटनेत पिंपरी येथीलच ‘शार्प डायग्नोस्टिक प्रायव्हेट लि. (मेगाव्हिजन स्कॅन्स)’ यांनी श्री. अवघडे, तसेच त्यांच्या कुटुंबातील अन्य दोघे सदस्य यांचे ‘सिटी स्कॅन’ केले. त्यासाठी त्यांनी दोघा सदस्यांकडून प्रत्येकी ४ सहस्र रुपये, तर एका सदस्याकडून ४ सहस्र ५०० रुपये घेतले. यावर समितीने त्यांना वरीलप्रमाणे केलेल्या मार्गदर्शनानुसार श्री. अवघडे यांनी याविषयी ‘शार्प डायग्नोस्टिक प्रायव्हेट लि. (मेगाव्हिजन स्कॅन्स)’कडे तक्रार केली. तक्रार करतांना आधुनिक वैद्यांचे तपासणीसाठीचे पत्र, त्यांचे देयक, तपासणी अहवाल इत्यादी सर्व कागदपत्रे जोडली. ‘यावर २ दिवसांत निर्णय घेऊन अतिरिक्त रक्कम परत करावी’, अशी मागणीही त्यांनी केली.
३. आरोग्य साहाय्य समितीने या ‘डायग्नोस्टिक सेंटर’ला महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या प्रतींसह सर्व कागदपत्रे पाठवून श्री. अवघडे यांच्या तक्रारीची तातडीने नोंद घेण्याचे सूचित केले. त्यानंतर दोन्ही ‘डायग्नोस्टिक सेंटर’ने आकारलेली ५ सहस्र ५०० रुपयांची अतिरिक्त रक्कम श्री. अवघडे यांना परत केली.
४. यावर श्री. अवघडे यांनी आरोग्य साहाय्य समितीचे आभार मानत ‘प्रत्येक गरजू नागरिकाने यातून प्रेरणा घ्यायला हवी’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘सिटी स्कॅन’ चाचणी करतांना आणि कोरोनाचे अन्य उपचार घेतांना शासन निर्णयानुसार देयक आकारले जात असल्याची निश्चिती करावी ! – आरोग्य साहाय्य समितीचे नागरिकांना आवाहन‘सिटी स्कॅन’साठी अतिरिक्त दराने आकारणी करून अनेक सामान्य रुग्णांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे ‘सिटी स्कॅन’ करतांना आणि कोरोनाचे अन्य उपचार घेतांना शासनाच्या निर्णयानुसार देयक आकारले जात असल्याची निश्चिती करावी’, असे आवाहन आरोग्य साहाय्य समितीने नागरिकांना केले आहे. |