गुन्हेगार महिलांचे वाढते प्रमाण चिंताजनक !
गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचा गुन्हेगारीतील सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या हत्या, खंडणी, अपहरण, चोरी आणि सायबर गुन्हे यांतही महिला गुन्हेगार आढळत आहेत. काही महिला गुन्हेगारांकडून बनावट (खोटी) कागदपत्रे दाखवून केली जाणारी फसवणूक, परस्पर घरे विकणे, आर्थिक अपहार असे प्रकार होतांनाही दिसत आहेत. सुशिक्षित मध्यमवर्गीय महिला गुन्हेगारीकडे वळण्यामागे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे त्यांची चंगळवादी मानसिकता ! आधुनिक राहणीमानाची ओढ, त्यासाठी लागणार्या पैशांचा असलेला मोह, ते झटपट मिळवण्याची अभिलाषा आणि आत्मकेंद्रित वृत्ती यांतून लुबाडणुकीच्या घटना घडतांना दिसतात. असुरक्षिततेची भावना किंवा वर्चस्व गाजवण्याची वृत्ती, संवेदनशीलता गमावणे यांमुळेही काही वेळा महिला नकळत गुन्हेगारीकडे वळतात.
काही वेळा अन्याय किंवा ताण यांना सामोरे जातांना सहनशीलता न्यून होत जाते. यातून सूडाची भावना बळावते, जी गुन्हेगारीस जन्म देते. महिलांचा गुन्हेगारीतील सहभाग वाढण्यामागे जशी सामाजिक, आर्थिक कारणे आहेत, तसे स्वभावदोषही कारणीभूत आहेत. गुन्हेगारीच्या उदयाचे मूळ व्यक्तीच्या षड्रिपूंमध्ये आहे. या षड्रिपूंना केवळ स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि साधना यांनीच नियंत्रणात आणता येऊ शकते. महिलांकडून देशाचे भावी नागरिक असणार्या मुलांवर संस्कार होणे अपेक्षित असते. त्याच जर गुन्हे करू लागल्या, तर देशाची प्रगती कशी होणार ? तसेच समाजात अराजकही माजेल. हा गंभीर परिणाम लक्षात घेऊन महिलांनी जीवनास दिशा देणे आवश्यक आहे. असे केल्यास त्या कधीच चुकीचा मार्ग अवलंबणार नाहीत. सर्वांगाने प्रयत्न करतांना महिलांना धर्मशिक्षण देणेही तेवढेच आवश्यक आहे, हेही लक्षात घ्यायला हवे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे