राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई चौधरी यांना अटक !
मुंबई – भोसरी भूखंड घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ७ जुलैच्या पहाटे सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’) अवैध व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (पी.एम्.एल्.ए.) अटक केली आहे. या घोटाळ्यामुळेच एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले.
‘बाजारभावाच्या तुलनेत कवडीमोल किमतीत भूखंड लाटल्यामुळे राज्य सरकारची ६१ कोटी २५ लाख रुपयांची हानी झाली आहे’, असा आरोप ‘ईडी’ने केला आहे. चौधरी यांना न्यायालयाने १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ‘६ जुलैला चौधरी यांची चौकशी करण्यात आली; मात्र या ते सहकार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली’, असे ‘ईडी’च्या अधिकार्यांनी स्पष्ट केले.
‘ईडी’ची ही कारवाई राजकीय हेतूने असून माझ्यासहित कुटुंबियांना छळण्याचा प्रयत्न ! – एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई – ‘‘ईडी’ची ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली असून माझ्यासहित कुटुंबियांना छळण्याचा हा प्रयत्न आहे’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ८ जुलै या दिवशी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. ‘मी भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो, तेव्हापासून माझ्या चौकशा चालू झाल्या आहेत’, असा आरोप त्यांनी केला. ‘ईडी’ला पूर्णपणे सहकार्य करत असून मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास सिद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यातील भोसरी औद्योगिक वसाहतीमधील भूमी घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे अडचणीत आले आहेत. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) खडसे यांना ८ जुलै या दिवशी चौकशीसाठी ‘समन्स’ बजावले होते. त्यानुसार एकनाथ खडसे हे ठरलेल्या वेळी ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित झाले.
भोसरी (जिल्हा पुणे) येथील भूमी घोटाळा प्रकरणएकनाथ खडसे भाजपच्या सत्ताकाळात महसूलमंत्री असतांना त्यांच्याकडे १३ खाती देण्यात आली होती. भोसरी येथील औद्योगिक वसाहतीमधील ४० कोटी रुपये बाजारमूल्य असलेला भूखंड खडसे यांनी मंत्रिपदाचा अपवापर करून कवडीमोल भावात म्हणजे केवळ ३ कोटी ७५ लाख रुपयांना स्वतःच्या नातेवाइकांच्या नावाने खरेदी केल्याची तक्रार पुणेस्थित उद्योगपती हेमंत गावंडे यांनी वर्ष २०१६ मध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात केली होती. याच्या आधारे विशेष अन्वेषण यंत्रणेने (एसीबी) खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी आणि मूळ भूखंड मालक अब्बास उक्कानी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये ‘एसीबी’ने पुणे न्यायालयात या प्रकरणी २२ पानी अहवालही सादर केला होता. |