सातारा जिल्हा रुग्णालयात लसीच्या कूपन वाटपावरून गदारोळ !
प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून ही समस्या त्वरित सोडवावी ही अपेक्षा !
सातारा, ८ जुलै (वार्ता.) – जिल्हा रुग्णालयात चालू असलेल्या केंद्रांवर लस देण्यासाठी देण्यात येणार्या कूपन वाटपामध्ये घोटाळा केला जात असल्याचा आरोप सातारावासियांकडून होत आहे. ७ जुलैच्या पहाटे केवळ १५ मिनिटांमध्ये कूपन संपल्यामुळे संतप्त नागरिकांनी लसीकरण केंद्रावरच गदारोळ केला.
लसीकरणासाठी शहरातील आणि बाहेरगावचे नागरिक मध्यरात्रीपासूनच रांगा लावत आहेत. लसीकरण केंद्राबाहेरील कर्मचारी तोंडे पाहून कूपन वाटप करत असल्याचे आरोप केले जात आहेत. एकाच नागरिकाला २ टोकन दिल्याचाही प्रकार घडला. यामुळे नागरिक संतप्त झाले. सुरक्षारक्षकांच्या मध्यस्तीमुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या वेळी नागरिकांनी लसीकरण केंद्राचे प्रमुख आधुनिक वैद्य कारंजकर यांच्याकडे केली आहे.