ओबीसी आरक्षणासाठी २९ जुलै या दिवशी एल्गार महामोर्चाचे आयोजन !

प्रतिकात्मक छायाचित्र

बारामती – सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण रहित केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्ग रहित करून निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय हक्कावर गदा येईल; म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने ओबीसी वर्गाच्या आरक्षणाकडे गांभीर्याने पहावे यासाठी २९ जुलै या दिवशी बारामती येथे पक्षविरहित एल्गार महामोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चासाठी महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण कृती समितीची स्थापना केली आहे. ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

या मोर्चामध्ये ओबीसी प्रवर्गात येणार्‍या सर्व जातींचा समावेश असणार आहे. यासाठी पुणे जिल्ह्यात गावोगावी घोंगडी बैठक, छोट्या-मोठ्या सभा, फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारने ओबीसी सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना तातडीने करावी तसेच सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या ३ अटींची पूर्तता करावी या मुख्य मागण्यांसह इतर मागण्याही महामोर्चामध्ये करणार आहेत.