नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण संतप्त ग्रामस्थांनी रोखले !
दीड घंट्यानंतर पुन्हा लसीकरण चालू
असे प्रकार टाळण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करणेच श्रेयस्कर !
कणकवली – तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ जुलैला नांदगावसह आजूबाजूच्या गावांतील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच केंद्रावर नागरिकांनी रांगा लावलेल्या दिसून येत होत्या; मात्र नांदगाव येथील स्थानिकांनी नोंदणी केल्यामुळे आता इतरांना लस मिळणे शक्य नाही, असे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितल्यावर तेथे आलेल्या अन्य गावांतील नागरिकांनी संतप्त होऊन ‘आम्हाला लस दिली जात नाही, तोपर्यंत लसीकरण होऊ देणार नाही’, अशी भूमिका घेतली. त्यामुळे केंद्रातील लसीकरण काही काळ थांबवण्यात आले. या वेळी नांदगावचे सरपंच अफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, भाई मोरजकर, कमलेश पाटील, आसिफ बटवाले यांनी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना लस दिली जावी, अशी मागणी केली. त्यानंतर थांबलेले लसीकरण दीड घंट्याच्या व्यत्ययानंतर पुन्हा चालू करण्यात आले.