गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल पी.एस्. श्रीधरन पिल्लई यांचा शपथविधी १५ किंवा १६ जुलैला होणार !
पणजी – गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल पी.एस्. श्रीधरन पिल्लई यांचा शपथविधी १५ किंवा १६ जुलै या दिवशी होऊ शकतो. मी त्यांच्याशी दूरभाषवरून बोललो आहे. त्यांनी मला १५ किंवा १६ जुलैला गोव्यात पोचेन, असे सांगितले आहे. येत्या १-२ दिवसांत त्यांच्या शपथविधीचा दिनांक निश्चित केला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
गोव्यात जनसंवादाद्वारे लोकांची स्पंदने टिपण्याचा प्रयत्न करीन ! – नवनियुक्त राज्यपाल श्रीधरन पिल्लई
पणजी – मला लोकांत मिसळणे आणि त्यांची स्पंदने टिपणे आवडते. त्यामुळे गोव्यात जनसंवाद हाच माझा मुख्य कार्यक्रम असेल, असे गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्त झालेले पी.एस्. श्रीधरन पिल्लई यांनी दैनिक गोमंतकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ते मिझोरमच्या राज्यपालपदी कार्यरत होते. ‘गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचे कळताच मी सुखावलो आहे. गोव्याविषयी मला नेहमीच आकर्षण राहिले आहे. मिझोरमविषयीची प्रलंबित कर्तव्ये पूर्ण करून लवकरच गोव्यात येईन’, असे श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ईशान्येकडील लोक बाहेरच्या माणसांशी फटकून वागतात. त्यांचा सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार हा ठरलेलाच असतो. मी त्यांच्याशी संवाद साधणे चालू केले आणि ते कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. आपण जर लोकांना प्रेम दिले, तर उलटपावली किमान द्वेष वाट्याला येणार नाही एवढे नक्की.