गुरुपौर्णिमेला प्रकाशित होणार्या ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !
गुरुपौर्णिमेच्या दिवशी (२३ जुलै २०२१ या दिवशी) सनातनचा ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. या ग्रंथातील भजनांच्या भावार्थांचे लिखाण प.पू. भक्तराज महाराज यांचे मुलुंड (मुंबई) येथील भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी आणि त्यांना साहाय्य त्यांची कन्या सौ. उल्का बगवाडकर यांनी केले आहे. या ग्रंथाचे आणखी २ भाग लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. आज या ग्रंथातील एक भजन आणि त्याचा भावार्थ येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/492835.html |
श्री गुरु येती ज्यांचे घरा ।
माया हा आध्यात्मिक मार्गातील मोठा अडसर आहे. मायेची हत्यारे म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू. मायेचा प्रभाव मनुष्याच्या मनावर सारखा पडत असतो. मनुष्याचे मन हे अत्यंत चंचल आहे. ते फुलपाखरासारखे इकडून तिकडे, म्हणजे या विचारावरून त्या विचारावर जात असते. मनाला गवसणी घालणे, ही दुरापास्त गोष्ट आहे. त्याला गवसणी घालण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ‘मन गुरुचरणी स्थिर करणे’. नामाविषयी प्रेम वाटू लागले की, मन गुरुचरणी स्थिर व्हायला लागते. मन गुरुसेवेत रत (रममाण) झाले की, साहजिकच माया आणि तिचे पाईक षड्रिपू यांचे बंधन शिथिल होते. देहरूपी घराची शुद्धी होते. हृदयमंदिरात भक्तीचा सुगंध दरवळू लागतो. भावाचा मंच हृदय-सिंहासनात सज्ज होतो आणि सद्गुरूंनी या सिंहासनावर विराजमान होऊन त्यांची पादसेवा करण्यासाठी मन अन् बुद्धी विनम्रपणे त्यांची वाट पाहू लागतात.
श्री गुरु येती ज्यांचे घरा ।
वाहे आनंदाचा झरा ।। धृ.।।
भावार्थ : श्री गुरु साधकाच्या घरात, म्हणजे हृदयात स्थानापन्न झाल्यावर त्याच्या मनात आनंदाचा झरा का बरे वहाणार नाही ? श्री गुरु माझ्या घरी (हृदयात) केव्हा येतील, तर ‘मी त्यांचा आहे’, अशी त्यांची निश्चिती होईल तेव्हाच ! यासाठी त्यांनी दिलेले नाम सतत माझ्या मुखी पाहिजे आणि त्या नामस्मरणाप्रती माझा भाव हवा, भक्ती हवी; पण ती भक्ती सकाम असू नये. प.पू. बाबांनी (प.पू. भक्तराज महाराजांनी) त्यांच्या एका भजनात म्हटले आहे, ‘शुद्ध भक्तीने बांधा मजला ।’ थोडक्यात, निष्काम भक्ती हवी !
रुपे कांचन तुच्छ वाटे ।
तोडी फासे भवबंधाचे ।
त्यांची कृपा होई ज्यासी ।
दुःखे त्यासी ना पीडिती ।। १ ।।
भावार्थ : सद्गुरु हृदय-सिंहासनावर विराजमान झाल्यावर होणार्या आनंदापुढे सोने, रुपे इत्यादी भौतिक संपत्तीही तुच्छ वाटायला लागते. मायेचे बंध तटातट तुटू लागतात. दुःख हे प्रकृतीशी (मायेशी) निगडित असते. ते सगुणाशी संबंधित असते. ‘आत्मा’ हा निर्गुण परब्रह्माचा अंश असल्यामुळे तो निर्भय असतो; म्हणून दुःख त्याला स्पर्श करू शकत नाही. सद्गुरूंच्या कृपेने देहाचा विसर पडल्यावर दुःखाची पीडा रहाणार कशी ?
नाम घेता मुखी त्यांचे ।
ओढी गाडे संसाराचे ।
कल्प वसे नाना चित्ती ।
देई क्षणी त्यासी मुक्ती ।। २ ।।
भावार्थ : ‘मुखात नाम आणि हातात काम’ ही स्थिती झाल्यावर हात नेहमीच्या सरावामुळे बिनबोभाट आपले कार्य करत असतात अन् चित्त नामातच रहाते. त्यामुळे संसाराचा गाडा आपोआप ओढला जातो. खेड्यातल्या स्त्रिया पाण्याने भरलेल्या घागरी डोक्यावर घेऊन खडकाळ रस्त्याने गप्पा मारत चाललेल्या असतात. वाटेत खाच-खळगे असतात; परंतु त्यांचे अवधान घागरींवर असल्याने त्या कोसळत नाहीत. तद्वतच मनात कितीही कल्प (शंका) उठोत, ‘नाम’ त्या शंकांना टिकू देत नाही.
चित्ती असू द्यावी भक्ती ।
दावी उद्धाराची युक्ती ।
चरणी देह अर्पी त्यांचे ।
होई सार्थक जन्माचे ।। ३ ।।
भावार्थ : चित्तात सदैव भक्ती असेल, तर भक्तीची ती ज्योतच उद्धाराचा योग्य मार्ग दाखवते. आपला देह (माया-मोहाने काठोकाठ भरलेला असला, तरी तो) सद्गुरूंना समर्पित केल्यावर आपण मुक्त होतो आणि मानवजन्म मिळाल्याचे सार्थक होते.
ऐशा माझ्या साई वंदा ।
मना लावी त्यांचे छंदा ।
सदा माना सत्यची बोला ।
दिना हृदयी साई भोळा ।। ४ ।।
भावार्थ : मुक्तीचा सरळ आणि सोपा मार्ग दाखवणार्या माझ्या साईंना (सद्गुरु प.पू. श्री अनंतानंद साईश यांना) शरण जा अन् अंतःकरणापासून त्यांचाच छंद स्वतःला लावा. या दिनाच्या (प.पू. बाबांच्या) हृदयात भोळा साईच बसलेला आहे आणि त्याच्याच साक्षीने मी तुम्हाला हे सत्य सांगत आहे.
(अन्य भजनांचा भावार्थ क्रमशः गुरुवारी प्रसिद्ध करत आहोत.)