सातारा पोलिसांकडून जिल्ह्यातील अनेक वारकरी आणि युवक यांची धरपकड !
प्रशासनाने अशी तत्परतेने कृती अन्य धर्मियांच्या संदर्भात कधी केली आहे का ?
सातारा, ७ जुलै (वार्ता.) – संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करण्यासाठी ७ जुलै या दिवशी जिल्ह्यातील वारकरी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार होते; मात्र तत्पूर्वी ६ जुलैच्या रात्रीपासूनच पोलिसांनी जिल्ह्यातील वारकरी आणि युवक यांची धरपकड चालू केली आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात बंडखोरी उफाळून येऊ नये, यासाठी पायी दिंडी काढण्याची चेतावणी देणार्या व्यसनमुक्त युवक संघाचे सचिव विलासबाबा जवळ यांना मेढा पोलिसांनी कह्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे. व्यसनमुक्त युवक संघाने सातारा पोलीस आणि प्रशासन यांच्या या दंडेलशाहीचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे.