कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांशी प्रभु श्रीराम यांचा संबंध !
प्रभु श्रीराम लंकेमध्ये जाण्यासाठी समुद्रदेवतेकडे रस्ता मागतात आणि त्यांना रस्ता मिळत नाही, तेव्हा श्रीरामांना क्रोध येतो. ते धनुष्य उचलतात आणि समुद्राला कोरडा करण्यासाठी ब्रह्मास्त्र चालवण्याचे ठरवतात. त्याच वेळी समुद्रदेव प्रगट होऊन झालेल्या चुकीविषयी क्षमा मागतात. समुद्रदेव श्रीरामांना सुचवतो की, ते वानरांच्या साहाय्याने समुद्रावर पूल बांधून लंकेला जाऊ शकतात.
प्रभु श्रीराम समुद्रदेवाची सूचना ऐकून त्यांना क्षमा करतात; परंतु रागाच्या भरात काढलेले ब्रह्मास्त्र परत ठेवू शकत नाही. त्यामुळे ते समुद्रदेवाला विचारतात, ‘आता हा बाण मी कुठे सोडू ?’ तेव्हा समुद्रदेव त्यांना द्रुमकुल्य देशावर बाण सोडण्यास सांगतात. समुद्रदेवाला वाटते, ‘द्रुमकुल्य देशात भयंकर डाकू रहातात आणि ते त्याचे जल दूषित करत असतात. त्यांचा आपोआप नि:पात होईल.’ प्रभु श्रीरामांनी त्यांचा बाण सोडला.
रामायणामध्ये दिलेल्या वर्णनानुसार या ब्रह्मास्त्रामुळे द्रुमकुल्यमधील सर्व डाकू मारले गेले; पण त्यामुळे तेथे उष्णता एवढी वाढली की, सर्व झाडे-झुडपे वाळून गेली. त्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशाचे वाळवंट झाले आणि त्याच्या जवळचा समुद्रही कोरडा पडला. हे वर्णन आश्चर्यकारक आहे. ज्या प्रकारे लंकेला जाणारा रामसेतू श्रीरामाच्या ऐतिहासिकतेचा पुरावा समजला जातो, त्याप्रमाणे या घटनेलाही सत्य समजले जाते. असे म्हणतात की, हे ठिकाण आजचे कझाकिस्तान आहे. त्या ठिकाणी अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत की, ज्यांचा संबंध रामायण काळाशी असू शकतो. वाल्मीकि रामायणानुसार श्रीरामांनी उत्तर दिशेला द्रुमकुल्यवर बाण चालवला. त्यांना ठाऊक होते की, या अस्त्राने डाकूंसमवेत निर्दाेष जीवजंतूही मारले जाणार आहेत आणि तेथे वाळवंट होणार आहे. त्यामुळे त्यांनी ‘तेथे काही दिवसांनी सुगंधित औषधी वनस्पती उगवतील आणि ते ठिकाण उत्तम फळे, मुळे अन् मध यांनी भरलेले असेल’, असा आशीर्वाद दिला.
कझाकिस्तानमध्ये ज्या ठिकाणी बाण पडला, ते ठिकाण ‘किजिलकुम मरुभूमी’ या नावाने ओळखले जाते. ते जगातील १५ वे सर्वांत मोठे वाळवंट आहे. स्थानिक भाषेत किजिलकुमचा अर्थ ‘लाल वाळू’, असा होतो. ‘ब्रह्मास्त्राच्या उष्णतेमुळे येथील रेती लाल झाली’, असे समजण्यात येते. या ठिकाणी अनेक दुर्लभ झाडे-झुडपे आढळून येतात. जवळच अराल समुद्र आहे, जो काळानुसार कोरडा पडतो. सध्या तो मूळ आकाराच्या केवळ १० टक्केच शेष आहे. किजिलकुमचा काही भाग तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांमध्येही आहे. रामेश्वरम्पासून या ठिकाणाचे अंतर अनुमाने साडेचार सहस्र किलोमीटर आहे.