लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदाचे पुढील उपचार करा !
प्रत्येक पालकांच्या मनात लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याविषयी जिज्ञासा असते. रोगप्रतिकारशक्ती चांगली रहाण्यासाठी शरिराचे बळ आणि पचनशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. १ ते १२ वर्षे वय असणार्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली रहावी, यासाठी आपण आयुर्वेदाप्रमाणे खालील उपाय करू शकतो.
१. नियमितपणे अभ्यंग करावे, म्हणजे सकाळी स्नान करण्यापूर्वी संपूर्ण शरिराला शुद्ध तीळ तेलाने किंवा नारळाच्या तेलाने मालीश करणे.
२. लहान मुलांनी प्रतिदिन १ – २ घंटे खेळले पाहिजे किंवा व्यायाम केला पाहिजे.
३. अभ्यंग, व्यायाम आणि नंतर स्नान या क्रमाने कृती कराव्यात.
४. सकाळी स्नान झाल्यावरच मुलांना आहार द्यावा.
मुलांच्या चांगल्या पचनक्रियेसाठी हे करा !
१. जेवणामध्ये हलका आणि पौष्टिक आहार द्यावा.
२. बेसन आणि मैदा यांच्या पदार्थांऐवजी सोजीपासून बनवलेले रूचकर पदार्थ जसे उपमा आणि इडली खाऊ घालावे.
३. लहान मुलांना विरुद्ध आहार, म्हणजे दूध आणि फळे एकत्र देऊ नयेत. तसेच कस्टर्ड खायला देऊ नये.
४. लहान मुलांना प्रतिदिन विशेषत: रात्रीच्या वेळी केळी आणि दही खाण्यास देऊ नये. आठवड्यातून २ – ३ वेळा दिवसा देऊ शकतो.
५. मुलांना भूक असल्यावरच जेवण द्यावे. त्यांना भूक लागत नसेल, तर योग्य वैद्यांना दाखवून औषधोपचार करावेत.
६. बाहेरचे अन्न उदा. चायनीज, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ अधिक खाण्यास देऊ नये.
७. मुले दूरचित्रवाहिनी किंवा ‘स्मार्ट फोन’ पहातांना जेवण करणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
टीप : लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेला ‘सुवर्णप्राशन विधी’ योग्य आयुर्वेद वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावा.
– वैद्या (सौ.) पूनम शर्मा, स्त्री आणि बालरोग तज्ञ, हरितश आयुर्वेद, हरियाणा.