अफाट लोकसंग्रह आणि निखळ प्रेमभावाचे मूर्त स्वरूप असलेले, तसेच निगर्वी अन् सर्वांना आधार वाटणारे मोर्डे, जिल्हा रत्नागिरी येथील पू. वैद्य विनय भावे !

२५.६.२०२१ या दिवशी सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावेकाका (वय ६९ वर्षे) यांनी रत्नागिरी येथे देहत्याग केला. आयुर्वेदीय क्षेत्रामध्ये पू. भावेकाकांची मोठी ख्याती होती. अफाट लोकसंग्रह आणि प्रेमभावाचे मूर्त स्वरूप असलेले पू. भावेकाका मनमोकळा स्वभाव, गोरगरिबांना साहाय्य करणे आणि सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणारे म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी त्यांना ‘रायगड भूषण’ हा पुरस्कार मिळाला होता. ७ जुलै २०२१ या दिवशी पू. भावेकाका यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्ताने पू. भावेकाकांना अनेक वर्षांपासून ओळखणारे काही संत आणि साधक यांनी पू. भावेकाका यांच्या हृद्य आठवणी येथे दिल्या आहेत.

पू. वैद्य विनय भावे

१. पू. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१ . साधी रहाणी आणि उच्च संस्कृती

‘वर्ष १९९१ पासून मला पू. वैद्य विनय भावे (पू. भावेकाका) यांचा सहवास लाभला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला आरंभी त्यांच्या समवेत अध्यात्मप्रसार करण्याची संधी मिळाली. त्यांचे रहाणीमान अतिशय साधे होते. त्यांच्या बाह्यांगावरून नवीन माणसाला ‘ते एक वैद्य, धर्मशास्त्र आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक, आयुर्वेदाची औषधे बनवणारे कारखानदार अन् गर्भश्रीमंत आहेत’, हे लक्षात येत नसे. त्यांचा सहवास लाभल्यावर त्यांचे गुण लक्षात यायचे. ते अवघ्या महाराष्ट्रातील वैद्यांमध्ये ‘वैद्य वरसईकर भावे’, म्हणून प्रसिद्ध होते.

पू. शिवाजी वटकर

२. साधक, धार्मिक व्यक्ती आणि वैद्य यांचे आश्रयस्थान

पू. भावेकाका साधक, धार्मिक व्यक्ती आणि दुःखी-पीडित यांचे आश्रयस्थान होते. मला त्यांच्याकडे काही कामासाठी जायचे असल्यास ते म्हणायचे, ‘‘वस्तीलाच (रहायलाच) या.’’ त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येकाचाच ते चांगला पाहुणचार करीत असत. ते सर्वांना साधना, धार्मिक किंवा व्यावहारिक अडचणींवर मार्गदर्शन करून आधार देत. अनेक वैद्यांनी त्यांच्याकडे ‘आयुर्वेदीय औषधे बनवणे आणि उपचार करणे’ शिकून घेऊन स्वतःचे व्यवसाय चालू केले.

३. आरंभीच्या काळात सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा आणि सत्संग सोहळे यांमध्ये स्वयंपाकघराचे दायित्व घेणे अन् स्वतः स्वयंपाक बनवून आवडीने सर्वांना खाऊ घालणे

वर्ष १९९२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या पहिल्या गुरुपौर्णिमेचे आयोजन मुंबई येथे केले होते. त्या वेळी पू. भावेकाकांनी त्या २ दिवसांतील भोजनव्यवस्थेचे दायित्व घेऊन स्वतः स्वयंपाक केला होता. नंतरही संस्थेच्या वतीने होणारे सत्संगसोहळे आणि साधकांच्या राज्यस्तरीय सत्संगाच्या वेळी पू. भावेकाका स्वयंपाकासाठी साहाय्य करायचे. त्यांच्यातील प्रेमभावामुळे त्यांना साधकांना चांगले पदार्थ करून खाऊ घालायला आवडायचे.

४. अध्यात्म आणि धर्म यांच्या प्रसारात तळमळीने भाग घेणे

डिसेंबर १९९२ मध्ये पू. भावेकाकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रायगड जिल्ह्यातील पहिल्या अध्यात्मप्रसार दौर्‍याचे नियोजन केले होते. मला गुरुकृपेने त्यांच्या समवेत राहून शिकण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ४ दिवसांमध्ये ७ प्रवचने आणि स्थानिक जिज्ञासू अन् प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीचे नियोजन केले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांचे पहिले प्रवचन त्यांचे जन्मस्थान नागोठणे येथे झाले. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील अध्यात्मप्रसाराला उत्तम प्रतिसाद मिळत गेला.

५. धर्मरक्षणासाठी केलेले साहाय्य

अ. प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि मंदिर सरकारीकरण कायदा यांना हिंदु जनजागृती समितीचा विरोध होता. पू. भावेकाकांचे रायगड जिल्ह्यातील वारकरी आणि इतर संप्रदायाचे प्रमुख यांच्याशी चांगले संबंध होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात आम्हाला याविषयी जनजागृती, आंदोलने आणि निदर्शने करता आली.

आ. मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनाने केलेल्या गैरप्रकाराच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वैध मार्गाने विरोध केला जात होता. परिणामी मंदिर व्यवस्थापनाकडून समितीच्या धर्मकार्याला साहाय्य होत नव्हते. त्या वेळी पू. भावेकाकांचे एक स्नेही तेथे व्यवस्थापक म्हणून आले. त्यांचे आम्हाला सहकार्य लाभले. समितीच्या वतीने काश्मीर आणि बांगला देश येथील हिंदूंवर केलेल्या अत्याचारांच्या संबंधीचे फलकप्रदर्शन लावायचे होते. मुंबईत त्यासाठी सभागृह उपलब्ध होत नव्हते. श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने आणि पू. भावेकाका यांच्या सहकार्याने व्यवस्थापनाने आम्हाला तेथे प्रदर्शन लावू दिले. तेथे १२ ते १५ जुलै २००७ असे ४ दिवस प्रदर्शन लावण्यात आले आणि २५,००० पेक्षा अधिक हिंदूंनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.

६. संतांप्रती भाव असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले, प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज, प.पू. काणे महाराज, करवीर पीठ, कोल्हापूर येथील शंकराचार्य, घाटकोपर, मुंबई येथील प.पू. जोशीबाबा इत्यादी संत पू. भावेकाकांकडे स्वतःहून यायचे. यावरून त्यांचा संताप्रतीचा भाव आणि धर्मकार्याची ओढ दिसून येते.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा

परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली साधनेविषयीची सूत्रे म्हणजे अंतिम सत्य समजून त्यानुसार ते आज्ञापालन करीत. त्या संदर्भात काही शंका असतील, तरी ते म्हणायचे, ‘‘डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले) म्हणतील, तसे करूया. आपण कशाला काळजी करायची ? परात्पर गुरु डॉक्टर काळजी घेणारच आहेत.’’ प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या आणि कुटुंबातही मोठे प्रसंग घडले; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धेमुळे ते त्या प्रसंगाला शांतपणे आणि साक्षीभावाने सामोरे गेले. त्यांच्या पूर्ण कुटुंबाला परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञता, भाव आणि शरणागती आहे.

पू. भावेकाकांनी देहत्याग केल्यावर ‘एक संत मित्र स्थुलातून गमावला’, हे स्वीकारतांना माझ्या मनाचा थोडा संघर्ष झाला. मला त्यांच्याकडून दानशूरपणा, प्रीती, नम्रता, सातत्य, चिकाटी, निर्मळता, प्रांजळपणा, मनमोकळेपणा इत्यादी गुण शिकायला मिळाले. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘पू. भावेकाकांची या पुढेही आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करतो.’

(२६.६.२०२१)

पू. भावेकाका समष्टी गुरुसेवा सूक्ष्मातून करण्या गेले जनलोकी ।

पू. भावेकाका सनातनच्या संतमाळेतील संतरत्न शोभती ।
सनातनच्या आरंभीच्या अध्यात्मप्रसाराचा ते पाया असती ।। १ ।।

पू. भावेकाका व्यवसाय, साधना अन् धर्मसेवा यांची सांगड घालती ।
गुरूंच्या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात तन, मन अन् धन अर्पिती ।। २ ।।

प्रीतीस्वरूप पू. भावेकाका साधकांना स्वभावदोषांसह स्वीकारती ।
साधकांची साधना, धर्मप्रसार अन् गुरुकार्यास्तव जीवन समर्पित करती ।। ३ ।।

पू. भावेकाकांच्या शिरी धन्वन्तरिदेवतेचा वरदहस्त असे ।
सनातनच्या आयुर्वेदाची औषधे अन् ग्रंथ निर्मितीत त्यांचे योगदान असे ।। ४ ।।

पू. भावेकाका समष्टी गुरुसेवा सूक्ष्मातून करण्या गेले जनलोकी ।
कोटीशः कृतज्ञता व्यक्त करूया पू. भावेकाकांच्या चरणी ।। ५ ।।

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.६.२०२१)


पू. वैद्य विनय भावे यांच्या प्रवचनामुळे साधनेत स्थिर होणे आणि त्यांच्यातील निखळ प्रेमभाव अनुभवणे

पू. रमेश गडकरी

‘वर्ष १९९४ मध्ये मी साधनेत आल्यावर पहिल्या काही मासांतच मी वैद्य विनय भावेकाका यांचे (आताचे पू. वैद्य विनय भावेकाका) प्रवचन ऐकले आणि साधनेत स्थिर झालो. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील सनातन संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमागणिक मला त्यांच्यातील निखळ प्रेमभाव दिसत गेला आणि आमची आध्यात्मिक मैत्री वाढत गेली. आज त्यांच्या देहत्यागाने ‘माझा एक आध्यात्मिक मित्र गेला’, असे मला वाटले.

‘ते आता स्थुलातून जरी आपल्या समवेत नसले, तरीही ईश्वरी राज्याच्या स्थापनेमध्ये सूक्ष्मातून ते सतत कार्यरत रहातील’, याची श्री गुरूंनी निश्चिती दिली आहे.’

– (पू.) रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.६.२०२१)


सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावेकाका यांच्याविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे

१. श्री. अभय वर्तक, देहली सेवाकेंद्र

श्री. अभय वर्तक

१ अ. रुग्णाईत असतांना आधार देणे

‘मे २०२१ मध्ये मी १ मास रुग्णालयात भरती होतो. या कालावधीत आणि त्यानंतरही पू. भावेकाका माझी प्रत्येक ४ दिवसांनी भ्रमणभाष करून चौकशी करायचे. त्या वेळी ‘माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे आवरण काढणे, हाच त्यांचा हेतू असायचा’, असे मला जाणवायचे. पू. काकांचा भ्रमणभाष आल्यावर ते प्रथम २ – ३ वाक्यांत माझ्या प्रकृतीची चौकशी करायचे आणि लगेचच मला एखाद्या संतांची गोष्ट सांगायचे. तसेच ‘त्यातून काय शिकायचे ?’, हे सुद्धा सांगायचे. ते नेहमी संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, भागवतातील आणि भगवान श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायचे. पू. काकांचा मला आधार वाटत असे.

१ आ. अहंशून्यता

माझे आयुर्वेदातील उपचार त्यांच्याच मार्गदर्शनानुसार चालू होते. रामनाथी आश्रमातील वैद्या (कु.) अपर्णा महांगडे पू. भावेकाकांना विचारून मला औषधे कळवत असत. पू. काकांचा ‘कोरोना’च्या काळात ‘या आजारात कोणती आयुर्वेदिक औषधे उपयुक्त आहेत ?’, याविषयी एक लेखही दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाला होता. ते याविषयी नेहमी म्हणायचे, ‘‘मी काही करत नाही. सर्वकाही वैद्या अपर्णा करते आणि माझे नाव छापून येते. मला आयुर्वेदातील काय कळते ? देव काहीतरी करवून घेत असतो.’’

१ इ. प्रेमभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पू. भावेकाका !

१ इ १. कधी खायला घालून, कधी प्रेमाने पाठीवरून हात फिरवून, तर कधी आर्थिक साहाय्य करून प्रेमभाव व्यक्त करणे : ‘पू. भावेकाकांच्या संपर्कात आला आणि त्यांच्या प्रेमात पडला नाही’, असा माणूस विरळाच ! पू. भावेकाकांचे निर्मळ हास्य आणि प्रेमभाव ज्यांनी ज्यांनी अनुभवला, त्यांना हे वाक्य मनोमन पटेल आणि त्यांच्याविषयीचे शेकडो अनुभव डोळ्यांसमोर तरळून जातील. अनेकांना जीवनात अडचणी आल्यावर पू. भावेकाकांची आवर्जून आठवण येते. याचे कारण म्हणजे ‘पू. काकांमधील व्यक्त प्रेमभाव’, हे आहे. ते कधी तो खायला घालून, कधी प्रेमाने पाठीवरून हात फिरवून, तर कधी आर्थिक साहाय्य करून व्यक्त केल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात.

१ इ २. उत्तम स्वयंपाक करून खायला घालणे : ‘चांगला स्वयंपाक कसा करायचा ?’, हे पू. भावेकाकांनीच मला शिकवले. ते मला ‘फोडणी कशी घालायची ? त्यात काय शास्त्र आहे ?’, हे आवर्जून सांगायचे. पू. काका घरी आले की, घरात नवचैतन्य पसरायचे. काही पदार्थ बनवायचा राहिला असेल, तर ते स्वतः फोडणी घालायचे. पू. काकांनी बनवलेल्या पदार्थांना अलौकिक चव असायची.

१ इ ३. दुकानदाराशीही घनिष्ठ मैत्री आणि घरगुती संबंध असणे : ‘कोणत्या गावाला, कोणत्या दुकानात कुठला पदार्थ चांगला मिळतो ?’, हे पू. भावेकाकांना चांगले ठाऊक असायचे. तो पदार्थ विकत घेऊन ते इतरांना देत आणि त्या पदार्थाचे वैशिष्ट्यही सांगत. पू. काकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो पदार्थ विकणार्‍या दुकानदाराशीही पू. काकांची घनिष्ठ मैत्री किंवा घरगुती संबंध असायचे.

१ इ ४. समोरच्या व्यक्तीला समजेल, असे त्याच्या भाषेत बोलणे : समोर कातकरी व्यक्ती असली, तर त्याच्या भाषेत, ठाकूर असेल, तर त्याच्या भाषेत, सुशिक्षित असेल, तर त्याच्या भाषेत ते संवाद साधत. या गुणामुळे ते अल्पावधीतच कुणाशीही जवळीक साधायचे.

१ इ ५. ओळखीच्या माणसांच्या घरी लग्न असो वा दुःखाचा प्रसंग असो, पू. काका आवर्जून जात असत.

१ ई. फिरण्याची आवड

पू. काकांना केवळ महाराष्ट्रच नाही, तर गुजरात, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतील विविध तीर्थस्थळे चांगली ठाऊक होती. ‘तेथे कसे जायचे ? कोणता मार्ग चांगला आहे ? तेथे जाण्यासाठी कोणता ऋतु चांगला आहे ?’, याची माहिती त्यांना होती. पू. काकांकडे अनेक वर्षांपासून विविध चारचाकी वाहने आहेत. यातील सर्व वाहने लक्षावधी किलोमीटर चालली आहेत. पू. काकांचे वाहन कधी उभे नसायचे. कधी स्वतःसाठी, तर कधी इतरांसाठी. त्यांची गाडी नेहमी भरलेली असायची.

१ उ. सतत नामात मग्न असणे

‘गुंतुनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा ।’, या उक्तीप्रमाणे त्यांचे वागणे असायचे. पू. भावेकाका नेहमी हातात जपमाळ घेऊन सतत नामजप करायचे आणि इतरांकडूनही करवून घ्यायचे. ते नियमित आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करायचे. माझ्याकडून त्यांनी भागवत, प.पू. गोंदवलेकर महाराजांचे चरित्र आणि संत तुकारामांची गाथा हे ग्रंथ वाचून घेतले.

१ ऊ. पू. भावेकाका कुणालाही न कळता हळूवारपणे गेले !

पू. काकांकडे एवढे सारे गुण होते, त्यांच्याभोवती नेहमी अनेक जण असूनही त्यांचे वागणे कधीही स्वतःचे अस्तित्व ठसवणारे नव्हते. पू. काका कुठेही उपस्थित असले, तरी ते प्रसिद्धीपराङ्मुख होते. त्यांनी देह ठेवतांनाही इतका सहजपणे ठेवला की, कुणाला त्याची जाणीवच होऊन दिली नाही.

१ ए. परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती भाव

पू. भावेकाका नेहमी म्हणायचे, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे साक्षात् विष्णु आहेत. ते आहेत; म्हणून सर्व चालू आहे. केवळ त्यांच्या अस्तित्वामुळे सर्व होत आहे.’’ ‘पू. भावेकाका परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवरच विसावले आहेत’, असे मला जाणवत आहे.’

(२६.६.२०२१)

२. सौ. अनघा सुधाकर पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौ. अनघा पाध्ये
सौ. अनघा पाध्ये

२ अ. गावातील सर्वसामान्य माणूस आणि साधक यांना आधार वाटणे

‘२५.६.२०२१ या दिवशी रात्री पेण, रायगड येथील सनातनचे संत पू. भावेकाका यांनी देह ठेवल्याचे समजले. तेव्हा मला मोठा धक्का बसला. आम्ही सनातन संस्थेत आल्यापासून पू. भावेकाकांचा आम्हाला आधार वाटायचा. रायगड जिल्ह्यातील सर्वच साधक त्यांच्या घरातील अडचणी किंवा शारीरिक त्रासावर उपाय मिळवण्यासाठी पू. भावेकाकांकडे जायचे. पू. भावेकाकांच्या निर्मळ हसण्याने अन् त्यांनी प्रेमाने विचारपूस केल्यावर साधकांचे अर्धे त्रास दूर होत असत.

२ आ. प्रेमभाव

त्यांच्याकडे समाजातील आणि गरीब आदिवासी कुटुंबातील अनेक माणसे उपचारांसाठी येत. पू. काकांकडे हे रुग्ण कोणत्याही वेळी यायचे. पू. भावेकाका त्यांना प्रेमाने औषधे देत. घरी जाण्यास गाडी नसेल, तर त्यांना स्वतःच्या घरीच रहाण्यास सांगत. आपलेपणाने त्यांची जेवण्या-खाण्याचीही सोय करीत. त्यामुळे त्यांच्या गावातील (वरसई, पेण येथील) कित्येक जण त्यांना देवच मानत असत. साधक, समाजातील सर्वसामान्य व्यक्ती, गरीब, श्रीमंत, अधिकारी किंवा कुणीही असो, पू. भावेकाका त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायचे.त्यांची सर्वांशीच जवळीक होती. त्यामुळे जसे साखर ठेवली की, मुंग्या आपोआप जमा होतात, तसे ते जिथे जात, तिथे त्या परिसरातील माणसे आपोआप त्यांच्याभोवती जमा होत.

२ इ. संतांनी ओळखणे

आम्ही पू. भावेकाकांच्या समवेत पिंगुळी, कुडाळ येथे प.पू. राऊळ महाराज यांच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा तेथे पुष्कळ माणसे होती; पण प.पू. महाराजांनी पू. भावेकाकांना जवळ बोलावले आणि त्यांना प्रसाद दिला. (तेव्हा पू. भावेकाका संत झाले नव्हते.) प.पू. पांडे महाराज, श्रीरामपूरचे प.पू. भास्कर महाराज, प.पू. निळकंठ महाराज (हे मी पाहिलेले संत आहेत.) अशा अनेक संतांशी त्यांची जवळीक होती.

२ ई. कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणे

आम्ही साधनेत आल्यापासून पू. भावेकाका अनेक वेळा आमच्याकडे येत असत. ते अगदी घरातलेच असल्याप्रमाणे आमच्याकडे असायचे. त्यांच्या बोलण्यात निखळ प्रेम असायचे. कुणाविषयीही कधी प्रतिक्रिया नसायच्या. त्यांना सर्वच चांगले वाटायचे. आम्हाला आणि आमच्या मुलांना त्यांच्याविषयी फार आदर वाटायचा. आज ते आमच्यात नाहीत; पण त्यांची आठवण आमच्या कुटुंबाला प्रत्येक क्षणी येत राहील.’

(२६.६.२०२१)

वडिलांच्या मृत्यूसमयीही स्थिर असणारे श्री. विक्रम भावे !

‘पू. भावेकाकांनी देहत्याग केल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी मी श्री. विक्रम यांना भ्रमणभाष केला होता. त्याने मला सहजतेने सर्व घटना सांगितली. तेव्हा त्याच्या आवाजात साधनेची प्रगल्भता जाणवत होती. मी विक्रमला लहानपणापासून पाहिले आहे. प्रगल्भता, स्थिरता हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. या कठीण प्रसंगातही तो भावनाशील नव्हता, तर एक स्थिर साधक होता, हे विशेष आहे. तो सहजतेने म्हणाला, ‘‘भाऊ दिवेकर हे पू. भावेकाकांना मुलासारखेच आहेत. त्यांनी अग्नी दिला, हे योग्यच झाले.’’ श्री. संतोष आंग्रे आणि श्री. भाऊ दिवेकर पू. भावेकाकांच्या अंतिम समयी त्यांच्या समवेत होते. या दोघांचे भाग्य थोर आहे. पू. भावेकाकांच्या चरणी कोटीशः नमस्कार !’

– श्री. अभय वर्तक (२६.६.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.