विधीमंडळाच्या कामकाजाचा दर्जा खालावत चालला आहे ! – मुख्यमंत्री
मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे घडले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लाजिरवाणे होते. ही आपली संस्कृती नाही. विधीमंडळामध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार दिला जातो; मात्र विधीमंडळाच्या कामकाजाचा दर्जा उंचावण्याकडे वाटचाल आहे कि खालावण्याकडे ? हे पाहिले, तर विधीमंडळाच्या कामकाजाचा दर्जा खालावत चालला आहे, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित होते.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘जनता लोकप्रतिनिधींना सभागृहात पाठवते त्या वेळी स्वत:च्या जीवनात पालट व्हायला हवा, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यासाठी जनता निवडून देत असते; मात्र सभागृहात उत्तरदायी पक्षाकडून झालेले वर्तन योग्य नाही. सभागृहात ध्वनीवर्धक ओढणे, बेंबीच्या देठापासून ओरडणे हे लोकशाहीसाठी आरोग्यदायी नाही. लोकप्रतिनिधींनी राजदंड पळवून नेणे, ही कामकाजाची पद्धत नाही.’’