महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात आणीबाणी लावत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपची विधानसभेच्या बाहेर अभिरूप विधानसभा
मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – काल भाजपच्या १२ आमदारांचे अवैध रितीने जे निलंबन करण्यात आले, त्याच्या विरोधात आम्ही अभिरूप विधानसभा घेत होतो. शांतपणे चाललेली ही सभा चालू नये म्हणून मार्शल पाठवून या सभेतील ‘माईक’ आणि ‘स्पीकर’ काढून घेण्यात आले. असे करून सरकार आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात आणीबाणी लावत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
१२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ सकाळी ११ पासूनच भाजपकडून विधानसभेच्या पायर्यांवरच अभिरूप विधानसभा घेण्यात आली. या सभेत अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबर यांची निवड करण्यात आली होती. सभा काही काळ चालल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाने भाजपच्या या अभिरूप सभेतील ‘माईक’ काढून घेण्यात आले. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर त्यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
या वेळी फडणवीस म्हणाले,
१. सरकार आमचा आवाज बंद करू शकत नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही बोलत राहू.
२. काल आम्ही प्रसंगावधान दाखवले नसते, तर सभागृहात मारामारी झाली असती. सरकारकडून आमची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चालू आहे.
३. आम्हाला जर विधानसभेच्या बाहेर अभिरूप विधानसभा घेऊ दिली जात नसेल, तर आम्ही ‘प्रेसरूम’मध्ये सभा घेऊ. महाविकास आघाडी सरकार पत्रकारांचीही मुस्कटदाबी करत आहे. याचा आम्ही निषेध करतो.
मुंबई मॉडेल म्हणजे मृत्यूचे मॉडेल !
फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला देशाची कोरोनाची राजधानी करून टाकली आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक २२ टक्के सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे राज्यात मृत्यूचे थैमान आहे. या सर्व गोष्टी लोकांसमोर येऊ नयेत म्हणून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईत कोरोनामुळे झालेले १७ सहस्र मृत्यू लपवण्यात आले. ‘मुंबई मॉडेल’च्या नावाखाली पाठ थोपटून घेण्यात आली; पण हे ‘मुंबई मॉडेल’ नसून ‘मृत्यूचे मॉडेल’ आहे.