संभाजीनगर येथे कव्वालीचा कार्यक्रम घेतलेल्या ‘फार्महाऊस’ला जिल्हाधिकार्यांनी ठोकले टाळे !
एम्आयएम्चे खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेतल्याचे प्रकरण
संचारबंदीचे नियम झुगारून कव्वालीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले खासदार इम्तियाज जलील यांना ही चूकच वाटत नाही, त्यामुळे जनतेला धोक्याच्या खाईत लोटणारे लोकप्रतिनिधी जनतेची सुरक्षा कधीतरी करू शकतील का ?
संभाजीनगर – कोरोना आणि संचारबंदी यांचे नियम धाब्यावर बसवून ३ जुलैच्या रात्री विलंबापर्यंत दौलताबाद येथील ‘अंबर’ या खासगी ‘फार्महाऊस’वर कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी आयोजकांसह ६० जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. या कार्यक्रमात अनुमाने १५० ते २०० लोक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या प्रकाराची नोंद घेत ५ जुलै या दिवशी ‘फार्महाऊस’ला टाळे ठोकण्याचेे आदेश दिले.
स्वत: एम्आयएम्चे खासदार इम्तियाज जलील यांनी कव्वालीवर ठेका धरल्यानंतर काही लोकांनी त्यांच्यावर नोटांची उधळणही केली होती. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली. या कार्यक्रमाची ध्वनीचित्रचकती पडताळून खासदार जलील यांच्यावर पुढील कारवाई करायची कि नाही, हे ठरवण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. ‘फार्महाऊस’च्या मालक रफिक खान करीम खान यांच्यावर दंड आकारण्याचा निर्णयही नंतर घेतला जाणार आहे.
‘इतर पक्षांवर कारवाई नाही, मग आमच्यावरच का ?’ – इम्तियाज जलील
‘इतर पक्षांचे लोकही नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही, मग आमच्यावरच का ?’ असा आकांडतांडव एमआयएम् पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. अधिकारी हे सत्ताधार्यांच्या इशार्यावर काम करत आहेत, असा आरोपही जलील यांनी या निमित्ताने केला. (एकीकडे कोरोना आणि संचारबंदी नियमांचे उल्लंघन करायचे आणि दुसरीकडे त्याचे समर्थन करायचे, हे जलील यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींना शोभते का ? लोकप्रतिनिधीच जर कोरोना नियमांचे उल्लंघन करत असतील, तर त्यांचे अनुयायीही त्यांचे अनुकरण करतात. – संपादक)