पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देणारे महेश खिस्ते यांचा सन्मान
मुंबई येथे झालेल्या भव्य सोहळ्यात देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले यांच्या हस्ते गौरव
मुंबई – कोरोना संसर्गाच्या काळात समाजोपयोगी कार्य केलेल्या, तसेच नियमित आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक योगदान दिल्याविषयी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ‘दैनिक तरुण भारत’ सोलापूरचे उपसंपादक आणि पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. महेश खिस्ते यांचा विशेष गौरव करण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात ‘सन्मान देवदूतांचा’ या शीर्षकाखाली मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी सांगलीचे राजे विजयसिंह पटवर्धन, संकल्प प्रतिष्ठानचे डॉ. एन्.पी. कदम, कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक किरण जोशी यांसह अन्य उपस्थित होते. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये काम केलेल्या, तसेच समाजासाठी झटणारे महाराष्ट्रातील डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यातील नामांकित मान्यवरांचा समावेश या पुरस्कारात केला होता. मागील ३० वर्षांपासून राज्यातील विविध दैनिकांतून लेखन करणारे, तसेच सध्या ‘दैनिक तरुण भारत’ सोलापूरचे उपसंपादक म्हणून कार्यरत असणारे श्री. महेश खिस्ते यांचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.