कुटुंबासह संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी सनातनची साधना !
‘सनातन संस्थेचे सर्व संत आणि साधक यांचा सर्वांना एकच आग्रह असतो की, ‘साधना करा’; पण साधना करा, म्हणजे नेमके काय करा ? हे अनेकांना कळत नाही. विशेषतः संस्थेची ओळख जाणून घेऊ पहाणारी कोणतीही नवीन व्यक्ती ती शिक्षित असो कि अशिक्षित, उच्चभ्रू असो कि गरिब या गोष्टीचा नेमका उलगडा करून घेत नाही. त्यामुळे आपले असंख्य हिंदु बांधव सनातन संस्थेशी जोडले जाऊ शकत नाहीत. संस्थेविषयी त्यांना आपुलकी आणि प्रेमभाव असला, तरी हे ‘साधना’ प्रकरण आपल्या आवाक्याबाहेरचे असावे, असे त्यांना वाटत असते. त्यामुळे ते संस्थेशी आत्मियतेने जुळण्यापासून लांब रहातात.
चांगल्या कार्याचा प्रारंभ स्वतःपासून केल्यास त्याचे महत्त्व कळणे
सनातनचे अनेक साधक आणि संत यांची मांदियाळी आज साधनेमुळे अध्यात्म अन् ज्ञान यांच्या विविध स्तरावर जाऊन पोचली आहेत. प्रत्येक जण त्याच्या परीने ईश्वरीय ज्ञानकृपेच्या आधारे त्याच्या मित्र परिचितांना बोधप्रद अनुकरणीय असे ज्ञानामृत वाटत आहे. ‘साधना म्हणजे विविध जणांनी एकत्र येऊन केलेली ईश्वरी आराधना आणि त्या आराधनेच्या अनुषंगाने त्या साधकावर झालेली ईश्वरी कृपा !’, असा निष्कर्ष मी माझ्या ज्ञानामृताच्या आधारे काढला आहे. स्वतःला जमेल तशी आणि जमेल तेवढी केलेली सेवा, हाही साधनेचाच एक भाग आहे. साधक जेव्हा साधनेसाठी स्वतःचा वेळ देतो, तेव्हा त्याला हा बोध होतो. मी एकटा काय करणार ? मी काय करू शकतो ? लोक मला वेड्यात नाही ना काढणार ? असे संकुचित विचारच आम्हा हिंदूंना धर्माचे कार्य करण्यात प्रमुख अडसर बनतात. कुठल्याही चांगल्या कार्याचा प्रारंभ स्वतःपासून केला, तरच त्या कार्याचे महत्त्व कळते आणि ते इतरांनाही अधिक योग्य प्रकारे सांगता येते.
हिंदूंमध्ये साधनेविषयीचे अज्ञानमूलक दृष्टीकोन दूर करून त्यांना साधनेची गोडी लागणे आवश्यक !
नामजप हा साधनेचा मुख्य कणा आहे. सततच्या नामजपामुळे धर्माविषयी कार्य करण्यासाठी प्रोत्साहन आणि उत्तेजन मिळत रहाते. साधना आपल्याला आत्मिक आनंद मिळवण्याचे एक अतूट माध्यम बहाल करते. त्यामुळे सनातनचे संत ‘प्रत्येक व्यक्तीने साधना केली पाहिजे’, असे सातत्याने सांगत असतात. स्वतः अनुभव घेतल्याविना जगात कुठल्याही कार्याची महती किंवा त्या कार्याचा पोकळपणा समजत नाही. ‘साधना करा’, ‘साधना करा’, असे नियमित सांगण्यामागील आग्रहही याचसाठी आहे. एखाद्या नवख्या विशेषतः हिंदु तरुणाला आपण जेव्हा साधनेविषयी माहिती सांगतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये ‘साधना कर म्हणजे नेमके काय कर ?’, असा प्रश्न सहजपणे येत असतो. त्याच वेळी त्याला कुलदेवतेच्या नामजपाविषयी समर्पक माहिती दिली, तर त्याच्या साधनेची पायाभरणी होऊ शकते. साध्या सोप्या गोष्टी आचरणात आणायला नेहमीच कठीण असतात. आज हिंदूंमध्ये साधनेविषयी अज्ञानमूलक दृष्टीकोन पसरलेला आहे. तो प्रयत्नपूर्वक दूर करून सर्व हिंदूंना साधनेची गोडी लागणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य आणि हिंदु धर्म यांचे हित सहज साध्य होईल.
सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेमुळे कुटुंबासह संपूर्ण जगाचे कल्याण होणे
माझ्या आप्तेष्टांपैकी एक कुटुंब आहे. ते संपूर्ण कुटुंब श्रद्धाळू आणि धार्मिक कार्य सांभाळून गुजराण करणार्यांपैकी आहे. त्या कुटुंबातील एक महिला सनातन संस्थेशी पूर्वीपासून जोडलेल्या असून त्या नेहमी प्रवचने आणि आध्यात्मिक कार्यक्रम यांना जात असतात. ती जेव्हा घरातील अन्य सदस्यांना ज्ञानविषयक अमृताचे कण वाटू पहाते, तेव्हा ती सगळी माणसे या महिलेला मूर्खात काढतात आणि ‘गप्प रहा, आम्हाला तुझे ज्ञान नको आहे’, अशी हेटाळणी करतात. तिला स्वतःच्या कुटुंबातील सर्वांचे चांगले व्हावे, असे अगदी तळमळीने वाटते; परंतु साधनेविषयी अज्ञान असल्यामुळे तिचे कुटुंबीय तिला नेहमी फटकारतात. आज आपल्या हिंदु कुटुंबांमध्ये कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. देवतांचे महत्त्व, तसेच हिंदु धर्माचा अभिमान सर्वांना आहे; परंतु जेव्हा त्या धर्माच्या विकासासाठी काहीतरी करावे, असे सूत्र येते, तेव्हा प्रत्येकाची नकारार्थी भूमिका असते. सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेचे महत्त्व त्रिकालदर्शी आहे. ते प्रत्येक कुटुंबाने अंगिकारल्याने आपल्यासह संपूर्ण जगाचे कल्याण योग्य प्रकारे साध्य होऊ शकते.
– श्री. महेश पारकर, शिरोडा, गोवा.