‘अनिल देशमुख असेच मधे बोलत असल्याने ते ‘आत’ जात आहेत !’
-
सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाला सत्ताधार्यांचा आक्षेप
-
सत्ताधारी आमदार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी !
मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचे सूत्र उपस्थित केले. या वेळी सत्ताधारी सदस्यांनी त्यांना मधे मधे टोकण्याचा प्रयत्न केला. ‘विधानसभेचे कामकाज परंपरेनुसार चालावे’, असे सांगून मुनगुंटीवार नियमांचा दाखला देत असतांना सत्ताधारी पक्षातील आमदारांनी याला आक्षेप घेतला. त्यामुळे संतप्त होऊन मुनगंटीवार म्हणाले, ‘‘मी हरकतीचे सूत्र मांडले आहे. अनिल देशमुख असे मधे बोलले होते आणि आता ते ‘आत’ जात आहेत. तुम्ही मधे बोलण्याचे काही कारण नाही. सरकारची चमचेगिरी करू नका.’’ या वक्तव्यावरून सभागृहात सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले.
राज्य विधीमंडळाच्या २ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला ५ जुलैपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांनी गदोराळ घातला. भाजपचे नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरून केलेल्या वक्तव्याला सत्ताधारी सदस्यांनी वरीलप्रकारे आक्षेप घेऊन सभागृहात गोंधळ घातला. मुनगंटीवार आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्षांनी आक्षेपार्ह वाक्य कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख यांनी असाच विरोध केला म्हणून ते कारागृहात जात असल्याचे म्हटले आहे. हे काय धमकी देत आहेत का ? सभागृहात धमकी दिली जात आहे का ? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, सभागृहातील एखादा आमदार सत्ताधारी पक्षाचा असेल, तर त्याला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. मुनगंटीवार यांनी ‘चमचेगिरी चालू आहे का ?’ असा उल्लेख करणे योग्य नाही. हे शब्द कामकाजातून काढून टाकण्यात यावे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, मुनगंटीवार यांनी मला धमकी दिली आहे. हे कामकाजातून काढून टाकू नका. राज्यात सध्या तेच चालू आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’, ‘एस्.आय.टी.’ लावली जात आहे.