सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतलेल्या भावसत्संगाच्या ध्वनीचित्रफिती पहातांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती
१.‘धर्मसत्संग ‘फेसबूक’वर ‘लाईव्ह’ घेऊ शकते का ?’, या विचाराने मनावर ताण येणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत असल्याची जाणीव झाल्यावर ताण दूर होणे
‘धर्मसत्संगाची पूर्वसिद्धता करून तुम्ही तो (धर्मसत्संग) ‘फेसबूक’वर ‘लाईव्ह’ घेऊ शकता का ?’, असे मला एका साधकाने विचारल्यावर ‘ती सेवा परिपूर्ण करण्याची क्षमता माझ्यात आहे कि नाही ?’, याविषयी मी जरा साशंक होते. माझ्यासाठी ‘छायाचित्रकासमोर (कॅमेर्यासमोर) बोलणे’, ही पुष्कळ अवघड गोष्ट होती. मला छायाचित्रकाच्या मागे (कॅमेर्याच्या मागे) सेवा करायला आवडते. धर्मसत्संग घेण्याच्या अनुषंगाने मला प्रतिदिन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे भावसत्संग ऐकण्याची सुवर्णसंधी मिळाली. एकदा सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘आपण आणि परमेश्वर यांच्यामध्ये असणार्या ४ अडथळ्यांविषयी’ सांगितल्यावर माझ्या लक्षात आले, ‘मी सेवा करणार आहे’, या अहंयुक्त विचारामुळे माझ्या मनात ती साशंकता निर्माण झाली होती. वास्तविक ‘ही सेवा ‘मी’ करणार आहे’, हा विचारच मूर्खपणाचा (निरर्थक) होता. प्रत्यक्षात जेव्हा मला ती सेवा दिली गेली, तेव्हाच परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांचा संकल्प कार्यरत झाला होता. मला केवळ त्यांना शरण जाऊन सेवेतील आनंद अनुभवायचा आहे.
२. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतलेल्या भावसत्संगाची ध्वनीफीत (ऑडिओ) ऐकतांना पुष्कळ ऊर्जा आणि चैतन्य मिळून स्वतःला आध्यात्मिक लाभ होणे अन् अन्य साधकांनी ती ऐकतांना त्यांची भावजागृती होणे
प्रारंभी मला सद्गुरु पिंगळेकाकांनी घेतलेल्या भावसत्संगाची ध्वनीफीत (ऑडिओ) मिळत असे. मी प्रतिदिन त्या केवळ ऐकतांना मला पुष्कळ ऊर्जा आणि चैतन्य मिळत होते, तसेच मला आध्यात्मिक लाभही होत होते. मी त्या भावसत्संगांच्या संक्षिप्त ध्वनीफिती (ऑडिओ) चेन्नई येथील अन्य साधकांना ऐकण्यासाठी पाठवल्या. ते ऐकून त्यांचीही भावजागृती झाली असल्याचे त्यांनी मला कळवले.
३. ‘या आपत्काळात प.पू. गुरुदेव मला घरबसल्या सत्संग देऊन अल्प प्रयत्नांत घरूनच माझ्याकडून समष्टी सेवाही करवून घेत आहेत’, या जाणिवेने माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
४. हिंदी भाषेतील धर्मसत्संगाची संहिता वाचतांना त्यातील काही शब्द न समजणे; मात्र त्याच भाषेतील त्याच विषयाचा सद्गुरु पिंगळेकाकांचा सत्संग पहातांना त्यांच्या हातांच्या हालचाली, त्यांच्या आवाजातील पालट आणि त्यांच्या मुखावरील हावभाव यांमुळे विषयाचे सार समजणे
सद्गुरु पिंगळेकाका यांचे ‘धर्मसत्संग’ पहातांना मला ‘छायाचित्रकासमोर (कॅमेर्यासमोर) विषय कसा मांडायचा ?’, ते शिकायला मिळाले. सद्गुरु पिंगळेकाका विषय अतिशय चांगल्या प्रकारे मांडतात. त्यामुळे तो विषय सखोल आणि सुस्पष्टपणे समजतो. मी हिंदी भाषेतील धर्मसत्संगाची संहिता वाचतांना काही वेळा मला त्यातील काही शब्द समजत नसत. मला काही वेळा त्याचा संदर्भही लागत नसे; मात्र त्याच विषयाचा सद्गुरु पिंगळेकाकांचा हिंदी भाषेतील सत्संग पहातांना त्यांच्या हातांच्या हालचाली, त्यांच्या आवाजातील पालट आणि त्यांच्या मुखावरील हावभाव यांमुळे मला त्या विषयाचे सार समजायचे, तसेच ‘विषय कसा मांडायचा ?’, हेही कळायचे.
५. पतीने धर्मसत्संगाचे ध्वनीचित्रीकरण भ्रमणभाषवर करून ते ‘यू ट्यूब’वर ‘अपलोड’ करून तो इतरांना पाठवणे, त्यामुळे ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून तमिळ धर्मसत्संगाची सेवा करण्यास साधक सिद्ध होणे आणि त्यांनी सेवेला आरंभही करणे
मला हे सर्व समजल्यावर माझी भावजागृती होऊन आनंद वाटला. मी धर्मसत्संगाची संहिता तमिळ भाषेत लिहून काढली. माझे पती श्री. रवि हे धर्मसत्संगाचे ध्वनीचित्रीकरण त्यांच्या भ्रमणभाषवर करण्यास सिद्ध झाले. त्यांनी केलेले चित्रीकरण लगेचच ‘यू ट्यूब’वर ‘अपलोड’ करून तो इतरांना पाठवला (शेअर केला). त्यानंतर लगेचच तमिळ ‘फेसबूक’ची सेवा करण्यासाठी ‘व्हॉट्सॲप’द्वारे साधकांना संदेश पाठवण्यात आला. त्यामध्ये माझ्यासह सर्वश्री श्रीराम लुकतुके, गणेश शेट्टी, अंजेश कणगलेकर, श्रीहरि आणि सौ. सुगंधी जयराम यांचा समावेश होता. ‘तमिळ आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये ‘पोस्ट’ सिद्ध करणे, सत्संगाचे ‘लाईव्ह’ प्रसारण करणे, त्याचा प्रसार करणे’ या सर्व सेवांचे नियोजन करून आम्ही त्या सेवा वाटून घेतल्या. त्यानुसार सौ. सुगंधी जयराम आणि सौ. कल्पना बालाजी यांनी बालसाधकांसाठी ‘बालसंस्कार’ सत्संग घेण्याची सिद्धता दर्शवली. सौ. सुगंधी यांचे पती श्री. जयकुमार आणि सौ. कल्पना यांचे पती श्री. बालाजी त्या सत्संगांच्या ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेत आहेत. त्या सत्संगांचे तमिळ भाषेत भाषांतर करण्याची व्यवस्था करून त्यांनी सेवेला आरंभही केला आहे.
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू. (१३.४.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |