स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना सरकारने ५० लाख रुपयांचे साहाय्य करावे ! – विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी
विधान परिषद कामकाज
मुंबई – सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नील यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्याची आई आणि बहीण यांनी केला आहे. स्वप्नीलची मुलाखत घेण्यासाठी सरकारला दीड वर्षे वेळ मिळाला नाही, ही गंभीर गोष्ट आहे. सरकारने स्वप्नीलच्या अपेक्षांचा चक्काचूर केला. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना न्याय देण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे ही हत्या सरकार पुरस्कृत आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना सरकारने तात्काळ नियुक्ती द्यावी, तसेच स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे साहाय्य करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
यावर स्पष्टीकरण देतांना संसदीय कार्यमंत्री अनिल परब म्हणाले, ‘‘सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भरतीची प्रक्रिया थांबली होती. त्या संदर्भात सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेईल.’’