‘पंढरपूर वारीसाठी मी माघार घेत आहे’, असे सांगण्यासाठी पोलीस प्रशासनाचा माझ्यावर दबाव होता ! – संतवीर बंडातात्या कराडकर
वारंवार सांगूनही पोलिसांनी देवपूजाही करू दिली नाही
कराड, ५ जुलै – आषाढी वारीसाठी आम्ही वारकर्यांना घेऊन आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने निघाल्यावर आम्हाला पोलिसांनी कह्यात घेतले. त्या वेळी पोलिसांनी मला ‘मी पोलिसांसाठी म्हणून माघार घेत आहे आणि वैयक्तिक मी पंढरपूरपर्यंत चालणार नाही असे प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगा’, अशी माझ्यावर बळजोरी करण्यात आली, अशी माहिती संतवीर बंडातात्या यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितली. पोलिसांनी ३ जुलै या दिवशी पहाटे संतवीर बंडातात्या कराडकर यांना आळंदी येथे कह्यात घेतले आणि दुपारपासून पुढे कराड जवळील श्रीकृष्ण गोपालन केंद्रात स्थानबद्ध केले आहे. स्थानबद्ध केल्यानंतर काही प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
या वेळी संतवीर बंडातात्या म्हणाले
१. मी देवपूजा केल्याविना पाणीही पित नाही. हे वारंवार पोलिसांना सांगूनही त्यांनी मला देवपूजा करू दिली नाही. माझ्या जागी उच्च रक्तदाब आणि साखर यांचा रुग्ण असता, तर तो निश्चित दगावला असता.
२. वारकर्यांविषयी प्रशासनाने घेतलेली भूमिका ही स्वीकारार्ह नाही. याचा मी निषेध करतो. या प्रकारच्या आसुरी कार्यपद्धतीचे मूल्य यापुढील काळात शासनाला निश्चित मोजावे लागेल.
३. कोरोनाचे गांभीर्य आम्हालाही असल्याने मार्चपासून केवळ ५० वारकर्यांना वारी करण्याची अनुमती आम्ही मागत होतो; मात्र शासनाला पाझर फुटला नाही, हे दुर्दैवी आहे.