ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्याप्रकरणी पुणे येथे ५ जणांवर गुन्हा नोंद, दोघांना अटक !
पिंपरी (पुणे), ५ जुलै – ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपी राकेश मौर्य यांच्यासह त्याचे सहकारी आणि व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरे यांच्यावर आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्या पत्नी सोनाली साप्ते यांनी वाकड पोलिसांकडे केला आहे. या प्रकरणी ५ जणांवर वाकड पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्यापैकी व्यावसायिक भागीदार ठाकरे, विश्वकर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई आणि पिंपरी पोलिसांची पथके सिद्ध केली आहेत, असे पोलिसांकडून समजते. आत्महत्येविषयी एक चलचित्रफित राजू साप्ते यांनी स्वत: आत्महत्या करण्यापूर्वी यू ट्यूब या सामाजिक माध्यमाद्वारे प्रसारित केली आहे.
या सर्वांनी मिळून राजू साप्ते यांना जिवे मारण्याची तसेच व्यावसायिक हानी करण्याची वारंवार धमकी दिली होती. साप्ते यांच्याकडे असलेल्या प्रत्येक प्रकल्पामागे १ लाख रुपयांची मागणी आरोपींनी केली होती. त्यापैकी अडीच लाख रुपये देण्यासही भाग पाडले होते. ‘भागीदार असलेल्या चंदन ठाकरे यांनी विश्वासघात केला आणि आर्थिक फसवणूक केली. या सर्व आरोपींच्या त्रासाला कंटाळूनच राजू साप्ते यांनी ३ जुलै या दिवशी ताथवडे येथील रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली’, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.