विरोधकांचे सदस्य अल्प करण्यासाठीच भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – काही मंत्री सभागृह चालू नये, यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी सिद्ध करत आहेत. तालिका सभापतींना कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही, तसेच त्या वेळी मी तिथे उपस्थित नव्हतो. विरोधकांनी काहीही केले, तरी त्यांना आम्ही पुरून उरलो आहोत आणि त्यांचा बुरखा आम्ही फाडणार आहोत. विरोधकांचे सदस्य अल्प करण्यासाठीच भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,

१. भाजपच्या १२ च नाही, तर १०६ जणांना निलंबित केले, तरी ओबीसी आरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करू. आरक्षणाविषयी राज्य सरकारचे धोरण टोलवाटोलवीचे आहे.

२. सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून आमचे आमदार निलंबित करण्यासाठी कथा (स्टोरी) रचली आणि तशी कृती केली.

३. एक वर्ष नाही, तर ५ वर्षे निलंबन झाले, तरी आम्हाला चिंता नाही. यापूर्वी अनेकवेळा लोक मंचावर चढले; मात्र कधीही कुणाला निलंबित करण्यात आले नाही. अध्यक्षांच्या दालनात नेहमीच बाचाबाची होते; पण कधीही कुणी निलंबित होत नाही.

दालनातील ध्वनीचित्रीकरण पाहिल्यास प्रत्यक्ष काय घडले, ते लक्षात येईल ! – गिरीष महाजन, आमदार, भाजप

गिरीष महाजन, आमदार

या संदर्भात भाजपचे आमदार गिरीष महाजन म्हणाले, ‘‘सभागृहात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीची माहिती देत होते. त्याला आमच्या सदस्यांनी विरोध केला. अगोदरच अधिवेशन केवळ २ दिवसांचे असून आमचे संख्याबळ अल्प करण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली आहे. दालनातील ध्वनीचित्रीकरण पाहिल्यास प्रत्यक्ष काय घडले, ते लक्षात येईल. विनाकारण आरोप करणे योग्य नाही.’’

तालिबानी सरकार महाराष्ट्रात राज्य करू पहात आहे ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

आमदार आशिष शेलार

या संदर्भात भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘‘तालिबानी सरकार महाराष्ट्रात राज्य करू पहात आहे. मी स्वत: किंवा आमच्या कोणत्याही सदस्याने शिवीगाळ केलेली नाही. मी ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी करीत होतो, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चुकीचे आरोप केल्याच्या विरोधात हरकतीचा मुद्दा मांडत होतो. मी स्वत: पिठासीन अधिकारी भास्कर जाधव यांची क्षमा मागितली. असे असतांना माझे निलंबन करण्यात आले.