पंढरपूरच्या आषाढी वारीला बेळगाव जिल्ह्यातील वारकर्यांनी जाऊ नये ! – एम्.जी. हिरेमठ, जिल्हाधिकारी, बेळगाव
बेळगाव, ४ जुलै – महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांनी ११ ते २४ जुलै या कालावधीत आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणार्या पंढरपूर येथील वारीसाठी बेळगाव जिल्ह्यातील वारकर्यांना बंदी घातली आहे. पंढरपूर काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या यात्रेसाठी बेळगाव येथील वारकर्यांनी पंढरपूर येथे जाऊ नये, असे आवाहन बेळगाव जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी केले आहे.
प्रत्येक वर्षी बेळगाव जिल्ह्यातील काही दिंड्या आळंदी आणि देहू येथून पंढरपूर येथे जातात, तर एकादशीच्या अगोदर ८ दिवस सहस्रो वारकरी खासगी वाहने, रेल्वे, बस यांनी पंढरपूर येथे जातात; मात्र गेल्या वर्षीपासून वारीत खंड असून यंदाही वारी होणार नाही. बेळगाव जिल्ह्यातील वारकर्यांना पंढरपूर येथे प्रवेश नसल्याचे सोलापूर जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंद
महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणार्यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ अहवाल किंवा कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा दाखला बंधनकारक करण्यात आल्याने राज्य परिवहन कार्यालयाच्या बेळगाव शाखेने महाराष्ट्रातील बससेवा बंद केली आहे. यापूर्वी ४५० बस बेळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्रात ये-जा करत होत्या. या बस आता कर्नाटकच्या सीमेपर्यंत जात आहेत. शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत महाराष्ट्रात बससेवा बंद रहाणार आहेत, असे बेळगाव परिवहन नियंत्रक एम्.आर्. मुंजी यांनी दिली.