कर्नाळा बँकेच्या संतप्त ठेवीदारांचे ६ जुलैला आंदोलन
पनवेल – कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी पनवेल संघर्ष समितीने ६ जुलै या दिवशी सकाळी १०.३० वाजता कळंबोली येथे एम्.जी.एम्. रुग्णालयासमोर महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू याचे नेतृत्व करणार आहेत.
१. गेल्या वर्षभरापासून पनवेल संघर्ष समितीने सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकारी, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोर्हे, कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, सीआयडी विभागाचे रंजन शर्मा, सीआयडी पुणेच्या अधीक्षक रजनी सरोदे यांच्याकडे वारंवार बैठका घेऊन बँक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून संघर्ष चालू ठेवला आहे.
२. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे अधीक्षक शैलेंद्र कुमार यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराची त्यांनी नोंद घेतली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयाने थेट मुख्य आरोपीला अटक केल्याने पनवेल संघर्ष समितीच्या मेहनतपूर्वक लढ्याला मोठे यश आल्याची खात्री ठेवीदारांची झाली आहे.
३. कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना रहित करावा, ठेवीदारांच्या ठेवींना असलेले ५ लाखांपर्यंतचे विमा संरक्षण लक्षात घेऊन त्यांना पैसे द्यावेत, अन्य दोषींवर अटकेची कारवाई करावी, तसेच दोषींच्या मालमत्ता गोठवून त्या लवकरात लवकर लिलावात काढून ५ लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी द्याव्यात, या मागण्यांसाठी हे आंदोलन आहे, अशी माहिती कडू यांनी दिली आहे.