‘इंद्राक्षी स्तोत्र’ ऐकतांना ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिला तेजतत्त्वाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१. इंद्राक्षी स्तोत्र ऐकतांना ध्यान लागून विशुद्ध चक्रावर अग्नीसमान रंग दिसू लागणे : ‘२.२.२०२१ या दिवशी संध्याकाळी ५ वाजता रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ध्वनीक्षेपकावर ‘इंद्राक्षी स्तोत्र’ लावले होते. त्या वेळी मी ते स्तोत्र भावपूर्ण ऐकण्याचा प्रयत्न केला. स्तोत्र ऐकत असतांना अकस्मात् माझे ध्यान लागले. त्या वेळी मला माझ्या विशुद्ध चक्रावर अग्नीसमान तेजस्वी पिवळसर आणि केशरी रंग दिसू लागला. ‘विशुद्ध चक्रातून माझ्या देहाभोवती आणि देहाबाहेर तेज पसरले आहे अन् त्या तेजाचा रंग पांढरा आहे’, असे मला दिसले. त्या वेळी मला माझे अस्तित्व जाणवत होते. मला गळून गेल्यासारखे वाटत होते.
२. तेजतत्त्वाची अनुभूती येऊन ‘माता इंद्राक्षीने स्वतःभोवती संरक्षक कवच निर्माण केले’, असे वाटणे : नंतर मी उठून माझ्या खोलीत गेले. तेव्हा मला माझे शरीर पुष्कळ तापलेले वाटले. मी पलंगावर पहुडल्यावर मला पुष्कळ गरम होऊ लागले. ‘मला असे का होत आहे ?’, हे समजले नाही. अनुमाने ७ – ८ मिनिटे माझी अशी स्थिती होती. त्यानंतर मला हळूहळू बरे वाटू लागले. नंतर माझ्या शरिराचे तापमान नेहमीप्रमाणे होऊन मी शांत झाले. मला माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण नष्ट झाल्यासारखे वाटले. मला त्या वेळी तेजतत्त्वाची अनुभूती घेता आली. ‘माता इंद्राक्षीने तिचे संरक्षककवच माझ्याभोवती निर्माण केले’, असे मला वाटले.
माझी माता इंद्राक्षी आणि गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’
– कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |