परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथे आल्यानंतर आलेले अनुभव
‘वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले नाशिक येथे साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. तेव्हा नाशिकच्या जवळ असणार्या विदर्भ आणि मराठवाडा येथील साधकांनाही मार्गदर्शन ऐकण्यासाठी बोलावले होते. हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार होता आणि या कार्यक्रमाचे दायित्व माझ्यावर होते. मला एवढ्या मोठ्या सेवेचा अनुभव नव्हता.
१. केंद्रातील साधकांची एका खोलीत बसण्याची व्यवस्था करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना व्यासपिठावर जाण्यासाठी मार्ग मोकळा करणे
मार्गदर्शनाची वेळ जवळ येत होती. सभागृह साधकांनी तुडुंब भरले होते. माझ्याकडे अनेक सेवा; परंतु वेळ थोडा होता. मी शेवटच्या क्षणी सभागृहात गेल्यावर मला दिसले, ‘साधक दाटीवाटीने सभागृहात बसले आहेत. साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांना व्यासपिठावर जाण्यासाठी मार्ग मोकळा ठेवला नव्हता.’ हे माझ्या लक्षात आल्यावर मी साधकांना मार्ग मोकळा करण्याची विनंती केली; पण कुणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मी माझ्या केंद्रातील साधकांच्या जवळचा होतो; म्हणून मी त्यांना विनंती केली, ‘‘मी तुम्हाला बाजूच्या खोलीत ध्वनीक्षेपक लावून देतो. तेथे तुम्ही बसा.’’ त्यांनी माझे ऐकले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांना व्यासपिठावर जाण्यासाठी जागा झाली. मग मी कार्यक्रमस्थळापासून दूर दुसर्या सेवेसाठी निघून गेलो.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी खोलीत बसलेल्या साधकांची बसण्याची व्यवस्था व्यासपिठावर करणे !
काही वेळात परात्पर गुरु डॉक्टरांचे सभागृहात आगमन झाले. त्यांनी बाजूच्या खोलीत बसलेल्या साधकांना पाहिले आणि त्यांनी मार्गदर्शन चालू करण्यापूर्वी विचारले, ‘‘त्या साधकांचे खोलीत बसण्याचे नियोजन कुणी केले ?’’ माझे नाव पुढे आले. तेव्हा मी कार्यक्रमस्थळी नव्हतो. त्यांनी बाजूच्या खोलीत बसलेल्या सर्व साधकांना बाहेर बोलावून व्यासपिठावर बसण्यास सांगितले. नंतर कार्यक्रम चालू झाला.
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्यावर रागावले आहेत’, हे कार्यक्रमस्थळी आल्यावर समजणे
माझी सेवा पूर्ण झाल्यावर मी पुन्हा कार्यक्रमस्थळी आलो. तेव्हा दाराच्या बाहेरच एका साधकाने मला अडवले आणि विचारले, ‘‘तुम्हीच ओझरकर का ?’’ मी ‘हो’ म्हणालो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘अहो, परात्पर गुरु डॉक्टर तुमच्यावर पुष्कळ रागावले आहेत.’’ मी म्हणालो, ‘‘का बरे ?’’ तेव्हा त्या साधकाने सांगितले, ‘‘तुम्ही साधकांना बाजूच्या खोलीत बसवले, ते परात्पर गुरु डॉक्टरांना आवडले नाही. त्यांनी सर्व साधकांना व्यासपिठावर बसवून घेतले आहे. आता तुम्हाला ते विचारतील.’’
४. परात्पर गुरु डॉ. आठवले कार्यक्रम झाल्यावर काहीही बोलले नाहीत; म्हणून मीच त्यांना झालेली चूक सांगणे
मी संपूर्ण मार्गदर्शन झाल्यावर आत गेलो, तरी परात्पर गुरु डॉक्टरांनी काही विषय काढला नाही. ते पुढील कार्यक्रमासाठी निघाले, तरी मला काहीच बोलले नाहीत. तेव्हा मीच त्यांना भेटलो आणि म्हणालो, ‘‘प.पू. डॉक्टर, मीच साधकांना बाजूच्या खोलीत बसवले होते. माझी चूक झाली.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘हो; पण तुमच्या बाजूने कुणी बोलले नाही ना !’’
‘गुरुदेवांना साधकांकडून नेमके काय अपेक्षित आहे ?’, याचा मला उलगडा झाला. ‘माझ्या मनात चुकीमुळे निर्माण झालेली चलबिचल कधी विरून गेली ?’, हे मलाच कळले नाही.’
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (२४.३.२०१९)