देवास (मध्यप्रदेश) येथील एका गावामधील शेतकरी करत आहेत औषधी वनस्पतींची शेती !
सोयाबीनसारख्या पीकांमुळे होणार्या हानीमुळे घेतलेला निर्णय ठरला लाभदायक !
केंद्रशासन आणि राज्यशासन यांनी शेतकर्यांना अशा प्रकारची पिके घेण्यासाठी साहाय्य करावे. त्यातून पुढे येणार्या आपत्काळामध्ये लोकांना आयुर्वेदाची औषधे अधिक प्रमाणात आणि अल्प मूल्यांमध्ये उपलब्ध होतील !
देवास (मध्यप्रदेश) – देवास जिल्ह्यामध्ये आता काही शेतकर्यांनी परंपरागत पीक घेण्याऐवजी आयुर्वेदासाठी लाभदायक असणार्या औषधांची लागवड करण्यास प्रारंभ केला आहे. कमलापूर गावातील तरुण शेतकरी राकेश जाट यांनी गावातील अनेक शेतकर्यांना औषधी वनस्पतींची लागवड करण्याविषयी जागृती केल्यानंतर आता ५० हून अधिक शेतकरी अशा वनस्तपतींचे पीक घेत आहेत. यात विशेष करून तुळस आणि अश्वगंधा यांची लागवड केली जात आहे. यापूर्वी हे शेतकरी सोयबीनचे पीक घेत होते; मात्र पाण्याची कमसरता, रोग आदींमुळे त्यांना उत्पन्न न मिळाल्याने त्यांचा तोटा होत होता. त्यामुळे त्यांनी सोयाबीनचे पीक घेणे बंद केले.
१. राकेश जाट यांनी सांगितले की, वर्ष २०१५-१६ पासून त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड चालू केली. प्रथम १ बिघा (२० गुंठे) भूमीमध्ये लागवड केली आणि आता ती १० बिघामध्ये केली जात आहे. जबलपूर येथील कृषी तज्ञांचेही यासाठी मार्गदर्शन मिळत आहे.
२. राकेश जाट यांनी सांगितले की, तुळस आणि अश्वगंधा यांच्यासाठी पाण्याची समस्या निर्माण होत नाही, तसेच त्यांच्यावर किटकांचाही परिणाम होत नाही. या वनस्पतींसाठी रासायनिक खतांचीही आवश्यकता भासत नाही. जैविक खतांचा वापर केला जातो. २० गुंठ्यांच्या जमिनीत तुळशीचे पीक घेतल्यास त्यासाठी दीड सहस्र रुपये खर्च येतो. त्यातून १५ ते १८ सहस्र रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.